पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने धुरळा उडवत प्रचंड मोठा विजयोत्सव साजरा केला. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने बहुमत प्राप्त करत सत्ता स्थापन केली. हास्य कलाकार असलेले भगवंत मान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि पंजाबमध्ये नवीन राजकीय अध्यायाला सुरुवात झाली, असे सांगितले जात आहे. मात्र, भगवंत मान यांच्या शपथग्रहणावेळी उत्तम ग्रहस्थिती आणि शुभ योग जुळून आले होते. याचा शुभलाभदायक परिणाम भगवंत मान यांच्यावर होणार असून, आगामी कालावधीत त्यांची कारकीर्द, कार्यकाळ कसा असेल, ते जाणून घेऊया... (CM Bhagwant Mann)
पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९७३ रोजी पंजाबमधील संगरुर येथे झाला. मान यांची जन्म कुंडली धनु लग्न उदयाची असून, एकादश भावात सूर्य आणि बुध या दोन ग्रहांच्या युतीचा राजयोग जुळून येत आहे. पंचम स्थानी असलेल्या पंचमेश मंगळाची शुभ दृष्टी असून, बुधवर पडत असलेल्या दृष्टीमुळे ते हास्य कलाकार, अभिनेते बनू शकले आणि राजयोगामुळे भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचवले, असे सांगितले जात आहे. मात्र, भगवंत मान यांच्या कुंडलीत मिथुन राशीत शनी आणि चंद्राच्या विष योगामुळे नजीकच्या भविष्यकाळात भगवंत मान यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकेल, असे म्हटले जात आहे. वर्षभराच्या कालावधीनंतर राजकारणात मुरल्यावर आपली विशिष्ट ओळख निर्माण करण्यात यशस्वी होतील, असा अंदाज आहे. (Bhagwant Mann Janam Kundali)
केंद्र आणि भगवंत मान यांचे वाद-विवाद
भगवंत मान यांच्या शपथग्रहणावेळी मघा नक्षत्राचा स्वामी केतु सहाव्या स्थानी होता. सहव्या स्थानाचे स्वामी मंगळ अष्टमातील शुक्र आणि शनीशी युती करून होता. या योगामुळे भगवंत मान आणि केंद्र सरकारचे आगामी काळात काही वाद, खटके उडू शकतात, असे सांगितले जात आहे. काही मुद्द्यांवरून कठोर टीकाही होऊ शकते. याशिवाय अष्टमातील शनीमुळे आगामी ४५ दिवसांत एखादी अप्रिय घटना घडून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शपथग्रहणावेळी मघा नक्षत्रात चंद्र असल्यामुळे सदर मुहूर्त योग्य नसल्याचे म्हटले जात होते. मात्र, घृति योग असल्याने याचा प्रतिकूल प्रभाव फारसा पडणार नाही, असे मानले जात आहे.
भगवंत मान यांना प्रचंड यश, कीर्ती, प्रगती
भगवंत मान यांच्या कुंडलीतील केंद्रात असलेला गुरु आणि जुळून येत असलेला गजकेसरी योग यामुळे मान यांना प्रचंड यश, कीर्ती मिळू शकते. याशिवाय, अमलकीर्ती योगामुळे प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. नवांश कुंडलीतील मिथुन लग्न वर्गोत्तम होत असल्यामुळे राज्यात महसुलात वाढ आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यास मान यांना काही प्रमाणात यश मिळू शकते, असे सांगितले जात आहे.