पौष शुद्ध एकादशीला पुत्रदा एकादशी व्रत केले जाते. आजच्या विज्ञान युगातही या एकादशीचे तेवढेच महत्त्व आहे. कारण, विज्ञानाला अध्यात्माची जोड ही लागतेच. प्रार्थनेत प्रचंड ताकद असते. आयुष्यात एखादी चांगली गोष्ट घडावी असे वाटत असेल तर त्यासाठी आपल्या पाठीशी अनेकांचे शुभाशीर्वाद लागतात, सद्भावना लागतात, तेव्हा ते आशीर्वाद फळतात आणि यश मिळते. या व्रतांमधून तोच संदेश दिला आहे. विज्ञानाच्या मदतीने आज अनेक दाम्पत्यांना संतान सुख मिळते, तर काही जणांच्या बाबतीत ते अयशस्वीही ठरते. अशा वेळी उपासना कामी येते. ती या व्रताच्या माध्यमातून करावी असे शास्त्र सांगते. संतान प्राप्ती झालेल्यांनी आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठीदेखील हे व्रत करावे. कारण त्याची प्रगती हेदेखील पालकांसाठी संतानाकडून मिळालेले सुखच असते. त्यासाठी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा, म्हणून हा व्रतविधी.
या दिवशी एकादशीचे व्रत आणि कथा वाचन केले असता पापातून मुक्तता आणि सद्गुणमंडित संतानप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. ज्यांना संतानप्राप्ती झालेली नाही, अशा लोकांनी भक्तिभावे पुत्रदा एकादशीचे व्रत केले असता त्यांना भगवान विष्णूंच्या कृपेने अपत्यप्राप्ती होते. अशी भाविकांची श्रद्धा आहे.
पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होते. म्हणून शक्य झाल्यास हे व्रत भाविकांनी चुकवू नये. मात्र दिलेले नियम जरूर पाळावेत.
>> हे व्रत करायचे निश्चित केल्यास एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून, गंगा मातेचे स्मरण करून तना मनाने पवित्र व्हावे.
>> मन शांत ठेवण्यासाठी पोथी किंवा कथावाचन करावे.
>> देवाची पूजा करावी आणि सत्कार्य करावे.
>> अपशब्द बोलू नये.
>> फलाहार व्यतिरिक्त अन्य काही खाऊ नये.
>> मद्यपान करू नये.
>> शरीरसंबंध ठेवू नये.
>> मन एकाग्र करण्यासाठी या व्रताशी संलग्न हे नियम दिलेले आहेत. या नियमांबरोबरच 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा दिवसभर मनात जप करावा.
संसारात विविध विषयात गुंतलेले मन एकाग्र करण्यासाठी, शांत करण्यासाठी एकादशीचे व्रत सांगितले जाते. आपल्या शरीर शुद्धीसाठी आयुर्वेदात जसा लंघनाचा पर्याय सांगितला जातो, तसा मनाच्या शुद्धीकरणासाठी एकादशी व्रताचा पर्याय अध्यात्मात सांगितला जातो. परंतु, उपासाचे पदार्थ खाऊन, आराम करून, टीव्ही, मोबाईल मध्ये अडकून व्रत केले तर त्याचा लाभ कदापि होणार नाही. औषधाला पथ्याची जोड लागते, तरच औषधाची मात्रा लागू पडते. त्याचप्रमाणे एकादशीला दिलेल्या नियमांचे पालन केले नाही, तर व्रताचा प्रभाव अनुभवता येणार नाही.
यासाठी भक्तिभावाने हे व्रत करावे. एकादशी व्रताचा लाभ अनेक भाविकांनी घेतला आहे. वर्षानुवर्षे लोक हे व्रत करत आहेत. त्या व्रताचा लाभ आपल्यालाही हवा असेल तर नियमांचे पालन करणे ओघाने आलेच!