पौष शुक्ल एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हणतात. १२ जानेवारी रोजी ही एकादशी आहे. वर्षभरातील इतर इतर एकादशीप्रमाणे या एकादशीलाही कथेचा संदर्भ जोडलेला आहे. यादिवशी व्रत कर्त्याने उपवास करावा आणि भगवान महाविष्णूंची पूजा करावी, असे म्हटले जाते.
पुत्रदा एकादशीची कथा :फार पूर्वी भद्रावती नामक नगरीचा राजा वसुकेत हा निपुत्रिक होता. पोटी संतान नसल्यामुळे त्या दाम्पत्याला राज्य, ऐश्वर्य, सुखदायक जीवन, सारे नीरर्थक, निरस वाटू लागले. पुत्रप्राप्तीच्या इच्छेने राजा एका अरण्यात गेला. तिथे एका ऋषींचा आश्रम होता. राजाने ऋषींना आपल्या मनीची व्यथा सांगितली. त्यावेळी या समस्येवर उपाय म्हणून ऋषींनी त्याला पुत्रदा एकादशीचे व्रत करायला सांगितले. त्यानुसार राजाने अतिशय श्रद्धापूर्वक हे व्रत केले. यथावकाश त्याला पुत्रप्राप्ती झाली, असा या कथेचा सारांश आहे.
पूर्वी पुत्रदा एकादशीचे व्रत पुत्रप्राप्तीच्या आशेने केले जात असे. परंतु, आधुनिक काळात संतानप्राप्तीसाठी विज्ञानाने इतके मार्ग शोधून काढले आहेत, की त्यासाठी असे एखादे व्रत करावे, हे लोकांच्या ध्यानातही नाही. यापुढे जाऊन संत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत म्हणतात,
नवसे पुत्र होती, तरि का करावा लागे पती।
इथे तुकडोजी महाराजांनी लोकांच्या भावनांशी खेळणाऱ्या बुवा, बाबांवर टिका करत वरील उद्गार काढले आहेत. संतानसुखासाठी आसुसलेले लोक श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील भेद विसरतात. अशा लोकांना तुकडोजी महाराज रोखठोक सवाल करतात, नवसाने पूत्र होत असेल, तर नवऱ्याची गरज काय? स्वतःची सद्सदविवेक बुद्धी वापरा आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका.
एकादशी ही तिथी भगवान महाविष्णूंची लाडकी तिथी. म्हणून अनेक उपासक निर्हेतुकपणे दर महिन्याला एकादशी करतात. या उपासनेचे फळ मिळो न मिळो, परंतु भगवंताच्या चरणी आपली सेवा रुजू होते. हा भाव मनी ठेवावा. म्हणून, सदर एकादशीचे व्रत पुत्रप्राप्तीसाठी केले नाही, तरी त्यानिमित्ताने ईशसेवा घडावी आणि कृपादृष्टी लाभावी, या साध्या हेतूने एकादशी करता येईल.