- रोहन उपळेकर
आज भाद्रपद शुद्ध अष्टमी, महारासेश्वरी श्रीकृष्णप्रेमरससुधाब्धी भगवती श्री श्रीराधाजींची आज जयंती !! भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभूंच्याच रसमय परमप्रेमस्वरूपाला 'राधा' म्हणतात. ते स्वरूपही त्यांच्याच इतके अनाकलनीय आणि अद्भुत आहे, बोलाबुद्धीच्या पलीकडले आहे. रसो वै स: । असे श्रुतिमाउलीने श्रीभगवंतांचे स्वरूप कथन केलेले आहे. श्रीभगवंतांचा हा स्वरूपभूत प्रेमरस, त्यांची आल्हादिनी प्रेमशक्ती म्हणजेच श्रीकृष्णप्रेममयी श्रीराधाजी होत !
श्रीराधातत्त्व हे 'अकल्पनाख्य' तर आहेच; पण त्याचवेळी 'अकल्पनाख्यकल्पतरू' देखील आहे. ज्यांना श्रीभगवंतांच्या प्रेमकृपा प्राप्त करण्याची तीव्र इच्छा आहे आणि त्यासाठीच ज्यांनी अनन्यतेने आपल्या हृदयी श्रद्धाभक्ती धारण केलेले आहे, त्या भाग्यवान भक्तांच्यासाठी हेच श्रीराधातत्त्व, अकल्पनाख्य अशा श्रीभगवंतांचे कल्पनातीत प्रेम कृपापूर्वक प्रदान करणारा दैवी कल्पतरू होते. 'प्रियुचि प्राणेश्वरी' अशी अद्वैतलीला साकारणारे 'श्रीराधा-श्रीमाधव'स्वरूप परब्रह्मच या जगाचे परमप्रेमास्पद असे आद्य तत्त्व आहे.
सद्गुरु श्री माउली 'अनुभवामृता'च्या सुरुवातीला याच अनादिदांपत्याला 'जगाचि जिये जनकें ।' असे गौरवून प्रेमभावे वंदन करतात. आजच्या पावन दिनी आपणही भगवान श्रीकृष्णांच्या या परमप्रेममय श्रीराधा स्वरूपाचे पूजन, वंदन, गुणगायन, भजन, स्मरण आणि सेवा करून धन्य धन्य होऊ या. भगवती श्रीराधाजींना पांढरी सुगंधी पुष्पे, श्वेत चंपकाची (पांढऱ्या सोनचाफ्याची) फुले, तुलसीपत्रे, नैवेद्यासाठी विविध प्रकारच्या वड्या आणि महत्त्वाचे म्हणजे प्रेमाने व श्रद्धेने घेतलेले भगवन्नाम, ह्या सर्व गोष्टी आवडतात, असे महात्म्यांनी सांगून ठेवलेले आहे. आजच्या दिनी यातील ज्या ज्या शक्य होतील त्या त्या उपचारांनी आपणही या परमप्रेमळ, परमकृपाळू, सर्ववन्द्या मातृस्वरूपा भगवती श्रीराधाजींची यथामती सेवा करून त्यांच्याकडे प्रेमदान मागू या आणि आपल्या या मनुष्यजन्माचे सार्थक करून घेऊ या !
भगवती श्रीराधाजींच्याच देहापासून निर्माण झालेल्या त्यांच्या प्रधान सखी श्री ललिताजींच्या प्रत्यक्ष अवतार असणाऱ्या श्रीसंत आनंदमयी माँ यांनी आजच्याच तिथीला देहत्याग केला होता. त्यांचे समाधिमंदिर हरिद्वार मधील कनखल भागात श्रीदक्षेश्वर महादेव मंदिराजवळ आहे. पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या थोडे अलीकडे, चतु:श्रृंगी चौकातील फिरोदिया बंगल्याशेजारी श्री श्री माँचा आश्रम आहे. तेथे त्यांचे काही काळासाठी वास्तव्यही झालेले आहे. हे अतिशय शांत, भारलेले व पुण्यपावन स्थान आहे. प.पू.श्री.आनंदमयी माँच्याही पावन श्रीचरणीं पुण्यतिथी निमित्त आपण सादर साष्टांग प्रणिपात करू या !
आत्मानुभवी संतांच्या वचनांच्या आधारे श्रीराधातत्त्वाचा अल्पसा विचार आणि श्रीमद्देवीभागवतात आलेले तसेच महात्म्यांनी केलेले श्रीराधास्वरूपाचे मौलिक विवरण यावर प्रकाश टाकणारा लेख आपण या लिंकवर क्लिक करून आवर्जून वाचावा ही विनंती. अनुत्तरभट्टारिका महाभगवती श्रीराधाराणींच्या श्रीचरणीं आजच्या पावन दिनी आपण सर्वांनी प्रेमादरपूर्वक स्मरणवंदना समर्पून धन्य व्हावे ही प्रेमळ विनंती !
मनुवा भूल मत जैयो राधारानी के चरण।राधारानी के चरण, महारानी के चरण ॥