Radha Ashtami 2024: चातुर्मासाचा अनन्य साधारण महत्त्व असलेला काळ सुरू आहे. आषाढ, श्रावणानंतर भाद्रपद महिना सुरु झालेला आहे. गणेशोत्सवाची धूम देशभरात असल्याचे पाहायला मिळत आहे. याच काळात विशेषतः उत्तर भारतात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सण म्हणजे राधाष्टमी. श्रीकृष्ण आणि राधा यांच्याबद्दल कितीतरी लिहिले, ऐकले गेले आहे. किंबहुना गजर करतानाही राधाकृष्ण असे संबोधन करून केला जातो. राधाष्टमी व्रताचे महत्त्व आणि काही मान्यता जाणून घेऊया...
श्रावणात महिन्याच्या वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते. त्यानंतर भाद्रपद महिन्याच्या अष्टमीला राधाष्टमी साजरी केली जाते. काही पौराणिक मान्यतांनुसार, या दिवशी राधेचा जन्म झाला, असे म्हटले जाते. त्यामुळे हा दिवस अन्योन्य श्रद्धाभावाने साजरा केला जातो. श्रीकृष्ण आणि राधेच्या अनेक कथा प्रचलित आहेत. राधाष्टमीच्या दिवशी राधा-कृष्णाची विधीपूर्वक पूजा केली जाते. राधा-कृष्णाच्या मंदिरात पूजन, भजन, नामस्मरण, जयघोष केला जातो.
राधाअष्टमी व्रताचे महत्त्व आणि काही मान्यता
राधाष्टमीचे व्रत केल्यास राधाकृष्णाचा आशीर्वाद मिळतो. पौराणिक कथांमध्ये राधेला लक्ष्मीचा अवतार मानले जाते. त्याच बरोबर राधेला प्रेमाचा अवतार मानून तिला निसर्ग देवी संबोधले जाते. आंतरिक शक्ती वाढवण्यासाठी राधाष्टमीचे व्रत महत्वाचे मानले जाते. राधाष्टमीचे व्रत केल्याने दुःख दूर होतात आणि भक्तांच्या मनोकामनाही पूर्ण होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
राधाष्टमीचा मुहूर्त अन् पूजन विधी
भाद्रपद महिन्यातील शुद्ध अष्टमी तिथी मंगळवार, १० सप्टेंबर रोजी रात्रौ ११ वाजून ११ मिनिटांनी सुरू होत आहे. तर, बुधवार, ११ सप्टेंबर रोजी रात्रौ ११ वाजून ४६ मिनिटांनी समाप्त होईल. भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे राधाष्टमीचे व्रत ११ सप्टेंबर रोजी आचरले जाईल, असे सांगितले जात आहे. राधा अष्टमीचे व्रताचरण असाल तर राधाष्टमीची पूजा दुपारी १२ वाजेच्या आधी पूर्ण करावी. यामध्ये राधाकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा घेऊन त्याची षोडषोपचार पद्धतीने पूजा करावी. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती म्हणावी. राधाकृष्णाला मनोभावे नमस्कार करावा. राधाष्टमी व्रतकथेचे पठण किंवा श्रवण करावे. या दिवशी दुर्गाष्टमी असल्याने या दिवसाचे महत्त्व आणखीन वाढल्याचे सांगितले जात आहे.