चमत्काराला नमस्कार करणे ही आपल्या सर्वांची फार जुनी खोड आहे. जोपर्यंत काही चमत्कार घडत नाही, तोवर लोकांचा विश्वास बसत नाही. चमत्कार घडणे हा आभास आहे, की समजून उमजून केलेली कृती? चला, या गोष्टीवरून जाणून घेऊया.
एका गावात एक फकीर बाबा राहत होते. ते एका पायाने पंगू होते. मात्र एका पायाच्या जोरावर ते बेभान होऊन नाचत असत. त्यांचे वागणे, बोलणे, चालणे, नाचणे सगळेच चमत्कारिक असे. काही जण त्यांना भोंदू बाबा म्हणत, तर काही जण तपस्वी साधू. परंतु, त्या फकीराने कधीच मला मान द्या, माझी पूजा करा, असे गावकऱ्यांना सांगितले नाही. मात्र, हळू हळू त्यांची अनुभूती येऊ लागताच लोक त्यांना चमत्कारीक बाबा म्हणून ओळखू लागले.
त्या गावाला दुष्काळाचा शाप होता. गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागे. लोकांना प्यायला पाणी नाही, तर गाई गुरांना, शेतीला पाणी कुठून आणणार? गावकरी हवालदिल झाले. त्यांनी मिळून चमत्कारी बाबाला साकडे घातले आणि पाऊस पाडण्याचा चमत्कार त्यांनी करावा, असे विनवले.
चमत्कारी बाबांनी डोळे मिटून ध्यान लावले आणि सर्वांना निश्चिंत होऊन परत जायला सांगितले. आज रात्री पाऊस पडेल, याची त्यांनी शाश्वती दिली. सगळ्यांना पाऊस पडणार या विचाराने गार गार वाटू लागले. त्यांनी बाबांचे आभार मानले आणि गावकरी परतले. सगळे जण घरी गेले तरी प्रत्येकाचे कान आणि डोळे आभाळाकडे लागले होते. सायंकाळ होऊ लागली, तसतशी गावकऱ्यांची उत्कंठा वाढू लागली. रात्रीच्या चंद्रप्रकाशात कुठेही ढगांची दाटी नाही, की वातावरणात गारवा नाही. चमत्कारी बाबा आपल्याला निराश करणार असे वाटत असतानाच, एका एक चंद्र झाकोळला जाऊ लागला. ढग जमा झाले. सोसाट्याचा वारा सुटला आणि तापलेल्या जमिनीवर पाण्याचे एका मागोमाग एक टपोरे थेंब बरसू लागले. गावकऱ्यांनी नाचून, गाऊन, पावसात भिजून जल्लोष केला.
गावकरी त्या भर पावसात चमत्कारी बाबांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या भेटीला गेले. तिथे जाऊन पाहतो तर काय, चमत्कारी बाबा एका कुबडीच्या सहाय्याने एका पायावर उड्या मारत नाचण्यात रंगले होते. गावकरी त्यांचा आवेश बघतच राहिले. त्यांचे नाचणे थांबले, तसा पाऊसही कमी होत होत थांबला.
लोकांनी बाबांना डोक्यावर घेतले. तेव्हापासून गावात जेव्हा केव्हा पाण्याची कमतरता भासू लागेल, तेव्हा तेव्हा चमत्कारी बाबांना सांगून ते पावसाला बोलावून घेत.
त्या गावाच्या मार्गे प्रवास करत असताना बाहेर गावची चार पाच तरुण मुले रात्रीच्या वेळी गावात थांबली. मुलांना गावकऱ्यांकडून चमत्कारी बाबांबद्दल कळले. मुलांनी हसून गावकऱ्यांची थट्टा केली. आणि ही सगळी अंधश्रद्धा आहे, असे म्हणत चमत्कारी बाबांचा चमत्कार नाकारला. गावकऱ्यांनी मुलांची आणि बाबांची भेट घालून दिली. मुले म्हणाली, एवढे असेल, तर आम्हीही नाचतो, मग तुम्ही नाचा. कोणाच्या नाचण्याने पाऊस पडतो, ते पाहूच!
चमत्कारी बाबांनी आव्हान स्वीकारले. मुले एक एक करून हर तऱ्हेने नाचू लागली. त्यांचे नाचून झाल्यावर बाबांनी नाचायला सुरुवात केली आणि साधारण तासभर नाचून झाल्यावर धो धो पाऊस पडू लागला. मुलांनी बाबांचे पाय धरले आणि त्यांनी हा चमत्कार कसा घडवला, हे विचारले. यावर बाबांनी दिलेले उत्तर चमत्कारिक नसून आपल्या सर्वांच्याच आयुष्यात चमत्कार घडवेल असे आहे.
बाबा म्हणाले, 'माझ्या नाचण्याने पाऊस पडतो, कारण मी मनाशी ठरवून टाकतो, की मी नाचलो तर पाऊस पडेल आणि मी तोवर नाचतो, जोवर पाऊस पडत नाही.' याचाच अर्थ प्रत्येकाने आपल्या आयुष्यात चमत्कार घडवताना स्वत:ला दिलास दिला पाहिजे, की माझ्या प्रयत्नाला यश मिळेल आणि प्रयत्न तोवर करा, जोवर यश मिळत नाही. ही जिद्द ठेवली, तर कोणाच्याही आयुष्यात चमत्कार घडू शकेल.