लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे:रक्षाबंधन सण बुधवार, ३० ऑगस्टलाच दिवसभर साजरा करायचा आहे. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. जर मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल तो भद्रा करण असताना केला जात नाही. त्या दिवशी सकाळी १०.५८ ते रात्री ९.०२ भद्रा करण आहे. महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. त्यामुळे संपूर्ण दिवसात कधीही राखी बांधली तरी चालेल. भद्राकालात राखी बांधली तर वाईट होईल, असा मॅसेज व्हायरल होत आहे त्यात काहीही तथ्य नाही असे पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यानी सांगितले.
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा बुधवार ३० ऑगस्ट रोजीच असल्याचे त्यानी स्पष्ट केले. यावर्षी रक्षाबंधन सण कधी साजरा करायचा ? बुधवारी ३० ऑगस्टला की गुरुवारी ३१ ऑगस्टला? याविषयी पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण म्हणाले की, की बुधवार ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी श्रावण पौर्णिमेचा प्रारंभ होत आहे. गुरुवार ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजून ०५ मिनिटांनी श्रावण पौर्णिमा समाप्त होत आहे. शास्त्रनियमाप्रमाणे बुधवारी ३० ऑगस्ट रोजीच रक्षाबंधन सण साजरा करायचा आहे. शास्त्रनियम असा आहे की सूर्योदयापासून ६ घटिकांपेक्षा जास्त व्यापिनी अशा श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अपरान्हकाली किंवा प्रदोषकाली रक्षाबंधन करावयाचे आहे. तशी स्थिती बुधवारी ३० ऑगस्ट रोजीच आहे . म्हणून सर्वानी बुधवार ३० ऑगस्ट रोजीच रक्षाबंधन सण साजरा करावा असे दा.कृ.सोमण यानी स्पष्ट सांगितले आहे.