रक्षाबंधनाच्या सणाला बहीण भावंडांचा विषय निघाला की आठवण होते ती म्हणजे कृष्ण द्रौपदीच्या गोड नात्याची. रक्ताचे नाते नसले, तरी मनापासून भाऊ मानल्यामुळे त्या भावाने बहिणीच्या शीलाचे रक्षण केले आणि अतूट नाते जोडले. द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी कृष्णाने पुरवलेले वस्त्र ही द्रौपदीने दिलेल्या एका चिंधीची परतफेड होती. कशी? त्यासाठी वाचा ही गोष्ट-
महर्षी नारदांनी एकदा भगवान श्रीकृष्णाला विचारले, 'भगवंत, सुभद्रा तुमची धाकटी बहीण, तरी तिच्यापेक्षा द्रौपदी तुमची लाडकी, असे का?'
श्रीकृष्ण म्हणाले, 'सांगतो. त्याआधी तू जाऊन दोघींना आळीपाळीने सांग, कृष्णाचे बोट कापले गेले आहे, रक्ताची धार लागली आहे, पण वेळेला छोटीशी चिंधीसुद्धा मिळत नाहीये. एवढे कर, तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल.'
महर्षी आधी सुभद्रेकडे गेले. तिला निरोप दिला. ती हळहळली. परंतु, आपल्या सगळ्या जरी काठाच्या, नक्षीदार साड्या पाहता, चिंधी कुठून आणायची, असा तिलाही प्रश्न पडला. ती सगळीकडे चिंधीचा शोध घेऊ लागली. तिचा शोध होईस्तोवर महर्षी द्रौपदीकडे पोहोचले आणि तिलाही तोच निरोप दिला. वृत्त ऐकून द्रौपदीच्या काळजात चर्रर्र झाले. मागचा, पुढचा विचार न करता, तिने लगेच आपलया भरजरी साडीचा तुकडा फाडून महर्षींना दिला आणि म्हणाली, 'आधी जाऊन माझ्या भावाचे रक्षण करा.'
चिंधीचा तुकडा घेऊन श्रीकृष्णाकडे परत येत असता महर्षी मनात म्हणतात, 'मी तुझ्या भावाचा रक्षण करणारा कोण, तोच साऱ्या विश्वाचे रक्षण करतो.' असे म्हणत महर्षींनी द्रौपदीने दिलेली चिंधी कृष्णाच्या हाती सोपवली. ती चिंधी हातात घेत श्रीकृष्णांनी जे उत्तर दिले, त्या प्रसंगाचे कथन प्रा. आचार्य अत्रे यांनी श्यामची आई चित्रपटातील गाण्यात केले आहे.
प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण,रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खूण,धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण, प्रीती जी करिती लाभाविणद्रौपदीसी बंधू शोभे, नारायण...!
याच निर्व्याज प्रेमाची, छोट्याच्या चिंधीची परतफेड श्रीकृष्णांनी द्रौपदीच्या लज्जारक्षणाच्या वेळी केली आहे. तिला एवढ्या साड्या पुरवल्या, की त्या फेडता फेडता दु:शासन दमला. दरबार वरमला. उपस्थित प्रत्येक जण द्रौपदीची कृष्णभक्ती पाहून खजील झाला.
असे हे भाऊ बहिणीचे गोड नाते. एकाला त्रास झाला की दुसऱ्याला न सांगता ती वेदना पोहोचणारच. मग ते नाते रक्ताचे असो नाहीतर मानलेले... प्रेमाचा दुवा जोडणारा असला म्हणजे मिळवले! अशाच तमाम बहीण भावांना रक्षा बंधनाच्या शुभेच्छा!