- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी( बीड, महाराष्ट्र, ८७ ९३ ०३ ०३ ०३)
परद्रव्य आणि परनारी या पापातून जो अलिप्त आहे किंवा या दोन पापांच्या विटाळाचा ज्याला स्पर्श झाला नाही तोच माणूस या संज्ञेला प्राप्त होतो, असे संत म्हणतात. तुकोबाराय एका अभंगात आग्रहपूर्वक सांगतात -
साधने तरी हीच दोन्ही जरी कोणी साधील ।परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ ॥
आज बहुतांशी माणसं या दोन पापांपासूनच मुक्त असत नाहीत. इतिहास तर सांगतो की, या दोन पापात अडकतात त्यांचे संपूर्ण जीवनच रसातळाला जाते. रावण, दूर्योधन, कीचक, जयंत या राजांची या उदाहरणे पुराण प्रसिद्ध आहेत.
आज अर्थ आणि काम या दोन मार्गांचा अनीतीने अवलंब करणारे रावण, दूर्योधन गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत असंख्य नाहीत का..? काम पिशाच्चाने झडपलेल्या रावणाने सीतेला पळवले हे सत्य पण तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला नाही, करु शकला नाही पण आजचे दुर्योधन मात्र कामवासनेच्या तृप्तीसाठी रक्ताची पवित्र नातीदेखील कलंकित करीत आहेत. बहिणीवर व मातेवर देखील बलात्कार केल्याच्या घटना वर्तमानपत्रांतून हरघडी वाचावयास मिळतात.
अर्थापेक्षाही काम वाईट..! म्हणून तर शास्त्रकारांनी पुरुषार्थाच्या चतुःसूत्रीत कामाला आणि अर्थाला मधे टाकले. पुरुषार्थाची चतुःसूत्री धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशीच आहे. माणूस मात्र हा शास्त्राधार संपूर्णपणे विसरला.
ज्याचे डोळे कामांधतेने भरले आहेत तोच खरा रावण समजावयास हवा. जो सातत्याने स्त्री सौंदर्याचेच चिंतन करतो, त्याला रावण म्हणू नये तर काय..? रावण हा अर्थ आणि काम या दोन विकारांमुळे राक्षस ठरला.
ज्या नेत्रांनी परमेश्वराच्या अप्रतिम लावण्याचा आनंद उपभोगावयाचा तेच डोळे जर कामवासनेने पीडित झाले तर रामदर्शन कसे होणार..?
डोळे निष्काम झाले तरच भक्तिमार्गाला सुरुवात करता येईल. डोळे बिघडले तर मन बिघडते. रावणाचे आधी डोळे बिघडले, मग मन बिघडले, नंतर संपूर्ण जीवनच बिघडले व राक्षसवर्गात त्याची वर्णी लागली. रावणाने जर रामकथेचे चिंतन, गायन, मनन केले असते तर ही दुर्दशा त्याच्या वाट्याला आलीच नसती. या दोन अनर्थांपासून वाचण्याचा एकच उपाय म्हणजे सत्संग..! श्रीसमर्थ रामदास स्वामी म्हणतात -
मुखी राम त्या काम बाधूं शकेना ।कदा अल्प धारिष्ट्य त्याचे चुकेना ॥
जिथे काम आहे तिथे राम वास करीतच नाही. राम ही एक वृत्ती आहे आणि माणसाने याच वृत्तीचा अंगीकार करावयास हवा..!
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥