आपण सगळेच उठतो, काम करतो, जेवतो, झोपतो, सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडतो. भौतिक सुखाची ओढ काही केल्या कमी होत नाही आणि त्यातून होणारा मनःस्तापही कमी होत नाही. अशा वेळी सर्व सुख पायाशी लोळण घेऊनही मिळत नाही ती मनःशांती! ती मिळवायची असेल ता मन शांत, एकाग्र करावे लागते. पण मनात इतके विचार सुरु असताना ते एकाग्र करायचे कसे हा आपल्यासमोर प्रश्न असतो. अशा वेळी प्रार्थनेत मन रमवावे. पण ती करतानाही मन एकाग्र होत नसेल तर श्रवणभक्ती करावी. म्हणजेच जिथे भजन कीर्तन सुरु आहे, सत्संग सुरु आहे तिथे सहभागी व्हावे. तेही शक्य नसेल तेव्हा आधुनिक माध्यमांचा वापर करून इंटरनेटवर घरच्या घरी श्लोक, स्तोत्र, भजन ऐकून मन एकाग्र करावे. त्यासाठी एक सुंदर राम स्तुती इथे देत आहे.
समर्थ रामदास स्वामींच्या अनेक रचनांपैकी ही एक रचना आहे. त्यात संसार तापाने शिणलेल्या मनुष्याचे दुःख कथन केले आहे आणि त्यातून बाहेर काढण्यासाठी श्रीरामाला आर्जव केला आहे. या कवनाला संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी अतिशय सुमधुर चाल बांधली आहे. त्यांचे सुपुत्र शुभंकर कुलकर्णी यांनी रामस्तुती गायली आहे, त्यांच्या सुस्वरात हे कवन ऐकताना आपलेही अष्टसात्विक भाव जागृत होतात. समस्त रामभक्तांना दैनंदिन उपासनेत या रामस्तुतीचा समावेश करता यावा म्हणून त्या रामस्तुतीचे शब्द देत आहे. युट्युबवर हे गाणं आपल्याला ऐकता येईल.
संसारसंगे बहु शीणलों मी । कृपा करी रे रघुराजस्वामी ।प्रारब्ध माझे सहसा टळेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १ ॥मन हे विकारी स्थिरता न ये रे । त्याचेनि संगे भ्रमतें भले रें ।अपूर्व कार्या मन हे विटेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ २ ॥मायाप्रपंचीं बहु गुंतलों रे । विशाळ व्याधीमधें बांधलो रे ।देहाभिमानें अति राहवेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ३ ॥दारिद्र्यदुःखे बहु कष्टलो मी । संसारमायेतचि गुंतलो मी ।संचित माझे मजला कळेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ४ ॥लक्ष्मीविलासी बहु सौख्य वाटे । श्रीराम ध्यातां मनि कष्ट मोठे ।प्रपंचवार्ता वदता विटेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ५ ॥अहोरात्र धंदा करितां पुरेना । प्रारब्धयोगें मज राहवेना ।भवदुःख माझें कधिही टळेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ६ ॥तीर्थासि जातां बहु दुःख वाटे । विषयांतरी राहुनी सौख्य वाटे ।स्वहीत माझें मजला कळेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ७ ॥मी कोठुनि कोण आलो कसा हो । स्त्रीपुत्रस्वप्नातचि गुंतलो हो ।ऐसें कळोनी मन हे विटेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ८ ॥असत्य वाक्यांनि मुकाच झालो । अदत्तदोषें दुःखी बुडालो ।अपूर्व करणी कशी आठवेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ९ ॥अब्रह्ममूर्ती भज रामसिंधू । चैत्यन्यस्वामी निजदीनबंधू ।अभ्यंतरी प्रेम मनीं ठसेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १० ॥विश्रांति देहीं अणुमात्र नाहीं । कुळाभिमानें पडलों प्रवाहीं ।अशांतुनी दूर कधी कळेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ११ ॥विषयीं जनांनी मज आळवीले । प्रपंचपाशांतचि बूडविले ।स्वहीत माझें मजला दिसेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १२ ॥नरदेहदोषां वर्णू किती रे । उच्चर माझें मनि वाटती रे ।ललाटरेषा कधि पालटेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १३ ॥मजला अनाथ प्रभु तूंचि दाता । मी मूढ की जाण असेंचि आतां ।दासा मनीं आठव वीरसेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १४ ॥