Ram Mandir Ayodhya News: राम मंदिराच्या उभारणीनंतर मागील वर्षभराच्या कालखंडात देश-विदेशातील ३ कोटींहून अधिक भक्तांनी रामललाचे दर्शन घेतले आहे. या मंदिराचे तीन मजले पूर्ण झाले आहेत. सध्या मंदिराच्या शिखराचे काम सुरू असून, ते दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे. उत्तर प्रदेशातीलअयोध्या येथे उभारण्यात आलेल्या राम मंदिरातील रामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पहिला वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल झाले. २२ जानेवारी २०२४ रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. परंतु, हिंदू पंचांगातील 'तिथी'नुसार यंदाचा वर्धापन सोहळा साजरा करण्यात आला. या दिवशी लाखो रामभक्तांनी रामललाचे दर्शन घेतले.
प्रभू श्रीराम आणि रामनामाच्या मोहिनीचे गारूड आजही कायम असल्याचे सांगितले जाते. मर्यादा पुरुषोत्तम असलेल्या श्रीरामांच्या आचरणाचे, नीतिमत्तेचे, शौर्याचे, धैर्याचे आजच्या काळातही दाखले दिले जातात. रामनाम आणि श्रीरामांचे चरित्र केवळ एक आदर्श नसून, त्यातील शिकवण ही कालातीत अशीच आहे. सर्वोत्तम, सर्वार्थाने श्रेष्ठ सेवक हनुमंतांपासून ते समर्थ रामदास स्वामी, तुलसीदास यांसारखे अनेक संत-सज्जन रामनामावर तरले. खुद्द वाल्मिकींनीही रामनामाचा अखंड जप केला होता, असे सांगितले जाते. रामनाम केवळ रामायण किंवा त्यानंतरच्या कालखंडापुरते मर्यादित नाही. तर रामनाम परब्रह्म, अनंताचे नाम असून, चिरकालाचे असल्याचे सांगितले जाते. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर साकारलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असून, गेल्या वर्षभरात राम मंदिराने अनेक जागतिक विक्रम प्रस्थापित केले, अशी माहिती समोर आली आहे.
१ वर्षांत राम मंदिराचे ६ जागतिक विक्रम; तुम्हालाही वाटेल अभिमान
- अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०२४ रोजी केले. या कार्यक्रमाला पहिल्याच दिवशी ५ लाखांहून अधिक भाविकांची अभूतपूर्व गर्दी जमली. रामललाच्या औपचारिक प्राणप्रतिष्ठा हा भक्तांसाठी एक महत्त्वाचा क्षण होता. राम मंदिराचे उद्घाटन राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरे करण्यात आले.
- १ जानेवारी २०२५ रोजी या इंग्रजी नववर्षाच्या पहिल्या दिवशी अयोध्येतील राम मंदिरात भाविकांचा जनसागर लोटला होता. ५ लाखांहून अधिक भाविक रीमदर्शन घेण्यासाठी आले होते. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पर्यटकांची संख्या वाढू लागली. ३१ डिसेंबरपर्यंत २ लाखांहून अधिक भाविक आले होते. तर १ जानेवारी रोजी ३ लाख अतिरिक्त भाविक आले.
- २२ जानेवारी २०२४ रोजी उद्घाटन झाल्यानंतर राम मंदिरात अवघ्या बारा दिवसांत २४ लाख भाविक अयोध्येत आले होते.
- ३० ऑक्टोबर २०२४ रोजी अयोध्येत दीपोत्सव सोहळ्यादरम्यान २,५१२,५८५ दिवे लावून एक उल्लेखनीय विक्रम प्रस्थापित करण्यात आला. हा एक ऐतिहासिक क्षण होता. कारण नव्याने बांधलेल्या भव्य राम मंदिरात रासाजरा होणारा हा पहिला दीपोत्सव होता. या कार्यक्रमाचे साक्षीदार असलेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या प्रतिनिधींनी या विक्रमाला अधिकृतपणे मान्यता दिली.
- ३० ऑक्टोबर २०२४ रोजी अयोध्येतील शरयू नदीच्या किनारी झालेल्या भव्य आरतीवेळी १,१२१ सहभागींनी एकाच वेळी दिवे ओवाळत आणखी एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. दीपोत्सव महोत्सवाचाच हा एक भाग होता.
- २०२४ मध्ये अयोध्याउत्तर प्रदेशातील सर्वाधिक भेट दिलेले ठिकाण बनले. जिथे १३५.५ दशलक्ष देशांतर्गत पर्यटक आणि हजारो आंतरराष्ट्रीय पर्यटक आले.