Ram Mandir News: जानेवारी २०२४ पासून अयोध्येतील भव्य राम मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आले. राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तेव्हापासून अयोध्येत भाविकांचा महासागर लोटला आहे. कोट्यवधी भाविकांनी रामदर्शन घेतले आहे. तसेच अयोध्येतील राम मंदिराला सढळ हस्ते दान दिले जात आहे. गेल्या चार दिवसांत सुमारे चार लाख भाविकांनी रामललाचे दर्शन घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
यंदाची राम नवमी अतिशय विशेष आणि वेगळी ठरली. राम मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर प्रथमच येणारी रामनवमी अयोध्येत मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. रामनवमीच्या दिवशी भाविकांना रामदर्शन सुलभ व्हावे, यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. रामनवमीनंतर राम मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळाली. परंतु, पुन्हा एकदा भाविकांनी रामललाचे दर्शन घेण्यासाठी राम मंदिरात गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसांत सुमारे चार लाख भाविकांनी रामाचे दर्शन घेतल्याचे सांगितले जात आहे.
प्रत्येक महिन्यात राम मंदिरात दीड कोटींचे दान
रामनवमीनंतर अयोध्येत येणाऱ्या भाविकांची संख्या ५० ते ६० हजारांवर आली होती. आता पुन्हा एकदा पर्यटकांसह भाविकांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या चार दिवसांत चार लाखांहून अधिक भाविकांनी रामललाच्या दरबारात दर्शन आणि पूजा केली. हा आकडा आणखी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच दर महिन्याला सुमारे दीड कोटींचे दान रामललाचरणी अर्पण केले जाते. विविध माध्यमातून हे दान दिले जात आहे. धनादेश, रोख रक्कम, आरटीजीएस आणि ऑनलाइन माध्यमांद्वारे रामललाचरणी भाविकांकडून निधी अर्पण केला जातो, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दिली आहे.
दरम्यान, रामललाचरणी अर्पण केले जाणाऱ्या दानाची दररोज मोजदाद होतो. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत दानात आलेली रक्कम मोजली जात होती. परंतु आता दोन शिफ्टमध्ये हे काम केले जाणार आहे. आता दानपेटीतील पैसे सकाळी ११ ते २ आणि दुपारी ३ ते ६ या वेळेत मोजले जाणार आहेत. देणगीची रक्कम मोजण्याची जबाबदारी स्टेट बँकेचे कर्मचारी सांभाळतात. रामललाचरणी अर्पण केली जाणारी रक्कम दिवसेंदिवस वाढत चालल्याने ती मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. दानपेटीतील पैसे मोजण्याऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या १४ वरून २० करण्यात आली आहे, अशी माहितीही गुप्ता यांनी दिली.