>> डॉ. भूषण फडके
ब्रह्मदेवांच्या आणि देवर्षी नारदांच्या आज्ञेप्रमाणे महर्षी वाल्मिकींनी रामचरित्र लेखनास सुरुवात केली. सत्यप्रिय रामांनी केलेले सर्व कार्य वाल्मिकींना दिसू लागले. अयोध्येत रावण वधानंतर प्रभू रामांनी सीतेचा त्याग केला. ती महर्षी वाल्मिकींच्याच आश्रमात आली. तीला जुळी मुलं झाली तीच लव-कुश. महर्षींनी दोन्ही राजकुमारांना अस्त्र-शस्त्र विद्या, राजविद्या, गायनकलेत प्रवीण केले.
अयोध्येत प्रभू रामांनी अश्वमेध यज्ञ आरंभिला. महर्षी वाल्मिकीही लव-कुश समवेत यज्ञमंडपात आले आणि त्यांनी रामचरित्र गायनास सुरुवात केली. कानात प्राण आणून मंत्रमुग्ध होऊन सभा लव-कुशाच्या तोंडून श्रीरामचरित्र ऐकण्यात गुंग होती. आता लव-कुशांनी अयोध्यानगरीच्या वर्णनाला सुरुवात केली.
पवित्र शरयू नदीच्या तिरावरचा कोशल देश आणि याच देशातील समृद्ध सुखी असे अयोध्यानगर. या नगरीचा प्रजाहितदक्ष, वेदवत्ता आणि धर्मवत्ता राजा ''दशरथ''. दशरथाला कौसल्या, सुमित्रा आणि कैकयी या तीन राण्या होत्या.. दशरथाचे प्रजेवर पुत्रवत प्रेम होते पण राजाला पुत्रसुख नव्हते याचे राजा आणि प्रजाजनांना दु:ख होते.
दशरथ राजा उत्तम धनुर्धर होते. शब्दवेधी बाण मारण्यात त्यांच्याइतका तरबेज त्याकाळी दुसरा कोणीही नव्हता. पुत्र नसल्याचे दु:ख हलके करण्यासाठी राजा मृगया करण्यासाठी जंगलात जात असे. एकदा दिवसभर प्रयत्न करूनही राजाला शिकार गवसली नाही. संध्याकाळ संपली , रात्र झाली राजा झाडावर बसला. एखादं श्वापद येईल आणि शब्दवेधी बाणांनी मी त्याला मारीन रात्री पाणवठ्यावर आवाज झाला. आवाजाच्या दिशेनी राजाने शब्दवेधी बाण मारला पण, ''मेलो, मेलो'' अशा आरोळीने राजा खाली उतरून पाहतो तो मुनीकुमार रक्ताच्या थारोळ्यात!
राजा दशरथ सत्यनिष्ठ आहे म्हणून बाण लागल्यावर तो उतरून चौकशी करतो नंतर श्रावणाच्या छातीतील बाण काढतो. मुनिकुमाराचा मृत्यू होतो.राजा पाणी घेऊन त्याच्या वृद्ध माता-पित्यांकडे जातो. त्याचे माता-पिता दशरथाला शाप देतात. ''पुत्रवियोगाने तुलाही मृत्यू येईल.'' वृद्ध माता-पिता श्रावण-श्रावण करत प्राण सोडतात.
राजा तिघांचेही अंत्यसंस्कार करून राजप्रासादात येतो. पोटी पुत्र नाही त्यात एक शाप. राजाच्या चेहऱ्यावरील ताण वशिष्ठ ओळखतात आणि दु:खाचे कारण विचारतात. राजाकडून हकीगत कळताच वशिष्ठ ऋषी म्हणतात, ''राजा, हा शाप नसून तुझ्यासाठी वरदान आहे. अरे, मृत्युसमयी तुझ्याजवळ पुत्र राहणार नाही म्हणजेच तुला पुत्रसुख आहे हे निश्चितच''. श्रावण कुमारच्या आई वडिलांच्या शापातून वेगळा अर्थ घेणाऱ्या वशिष्ठ ऋषींचा दृष्टीकोन योग्य आहे. !” वाईटातून चांगल घेण्याची वशिष्ठांची योग्यता यातून दिसून येते. आपण आजकाल +ve attitude म्हणतो ते हेच. हेच आपल्याला रामायणातून शिकायचे आहे. रामायणातील प्रसंग जीवनोपयोगी शिकवण देतात, म्हणूनच रामायणाचा डोळसपणे अभ्यास होणे आवश्यक आहे.
ऋषश्रुंग ऋषींना पुत्रकामेष्टी यज्ञासाठी सन्मानाने बोलविण्यात येते. यज्ञ सफल होतो आणि चैत्र महिन्यात शुद्ध नवमीला माध्यान्ह समयी कौसल्येला राम, सुमित्रेस लक्ष्मण-शत्रुघ्न तर कैकयीला भरत असे चार पुत्र होतात. रामाचा जन्म दुपारी का झाला? कारण लोकांच्या जीवनातील उन्हाळा (दाह) संपविण्यासाठी. अयोध्येची जनता राम जन्माने आनंदित झाली.
भ्रमणध्वनी : ९४२२४०९२९८