>> सर्वेश फडणवीस
जेव्हा आपण म्हणतो की "या गोष्टीत काही 'राम' नाही" तेव्हा 'राम' हा शब्द 'तथ्य' शब्दाचा पर्याय झालेला असतो. 'रामबाण उपाय' हा वाक्प्रयोग मराठीतही आहे, हिन्दीतही आहे आणि बहुधा सर्वच भारतीय भाषात तो आढळतो. 'रामबाण' हे मुळात एक सामासिक नाम ! पण ते विशेषण बनून येतं आणि 'अचूक, अमोघ' हा अर्थ दर्शवितं. प्रात:काळचा शुद्ध, मंगल प्रहर आपल्या भाषेत 'रामप्रहर' होऊन उगवतो. हिन्दीत तर मिठाला 'रामरस' म्हणतात. किती समर्पक ! चिमूटभर मिठावाचून जसं ताटभर भोजन बेचव, तसंच सूक्ष्म रामतत्त्वावाचून दीर्घ जीवनही निरर्थक! इथे 'राम' शब्द रसवत्तेचं अधिष्ठान आहे. - भेटल्यावर 'नमस्ते' म्हणणं ही आधुनिक पद्धत. (आता तर good morning - good evening मुळे तीही लोपत चालली आहे!) पण खेड्यात अजूनही 'रामराम' म्हटलं जातं. दोन हिन्दीभाषी भेटले की 'जै (जय) रामजी की' हे शब्द उत्स्फूर्ततेनं निघतात. नमस्ते नमः ते = तुला नमस्कार) पेक्षा 'जय रामजी की'ची खुमारी काही वेगळीच ! ते नमन असतं अन्तर्यामी वसणाऱ्या 'आत्मा' रामाला ! म्हणजे अवघ्या जीवनातली सार्थकता ('राम' असणे) अचूकपणा (रामबाण), विशुद्धता (रामप्रहर), रसवत्ता (रामरस) आणि सर्वव्यापित्व (रामराम) ह्या सर्व भावना व्यक्तविण्याचं सामर्थ्य 'राम' ह्या एकाच शब्दात आहे! जीवनातला परमोच्च आदर्श म्हणजे राम!
प्रभु रामाचं चरित्र अनेकांनी गायिलेलं आहे. मराठीत भावार्थरामायण आहे, रामविजय आहे, हिन्दीत रामचरितमानस आहे, बंगालीत कृत्तिवास-रामायण, गुजरातीत गिरधरकृत रामायण, तेलुगु भाषेत रंगनाथ रामायण, उडियामध्ये कवि बलराम दाश यांनी रचलेले जगमोहन रामायण तर तमिळमध्ये कंबरामायण ! रामाची कथा प्रत्येक भाषेला 'आपली' वाटली,आणि प्रत्येक कवीनं आपापल्या कल्पनेनुसार त्यात अनेक उपकथानकं जोडून ती कथा अधिकाधिक रोचक बनविण्याचा प्रयत्न केला! पण त्यामुळे एक गोंधळ झाला! स्थल-कालांच्या संदर्भात फरक दिसू लागला. कोणत्या रामकथेला खरं मानावं? उत्तर एकच ! रामाचा समकालीन असणाऱ्या महर्षि वाल्मीकींच्या लेखणीतून अवतरलेली मूळ रामकथाच प्रमाण मानायची !
मूळ वाल्मीकिरामायण, पं. सातवळेकरांचं भाष्य, वं. मावशींची (केळकर) प्रवचनं, श्रद्धेय गुरुचरण स्वामी गोविंददेवगिरि यांची प्रवचनं, या सर्वांतून मी 'राम' शोधत गेले. त्यातून मला जे आणि जितकं उमगलं, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात आहे. तटस्थ दृष्टीनं विचार केला तर राम हा एक क्षत्रिय राजकुमार. श्रीरामानं स्वतः कधीच म्हटलं नाही की मी ईश्वराचा अवतार आहे. 'आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम्' हे त्याचं प्रांजळ वचन वाल्मीकीनं नोंदवलं आहे.
व्यक्तीपेक्षा समष्टी श्रेष्ठ आहे हा विवेक श्रीरामाला क्षणभरही सोडून गेला नाही. त्यामुळेच तो नराचा नारायण झाला. प्रत्येकाच्या मुखी येऊ लागलं की,माता रामो, मत्पिता रामचन्द्रः ।स्वामी रामो, मत्सखा रामचन्द्रः ॥प्रभु राम हा आदर्शाचा, मांगल्याचा, अचूकतेचा नि रसवत्तेचा पर्याय बनला, आणि सुजनांच्या मनात दाटून आलं की 'प्रभाते मनी राम चिन्तीत जावा'.