>>डॉ. भूषण फडके
अयोध्येत दशरथ राजा रामाच्या विरहाने दु:खी असतात. त्यांना श्रावणकुमारच्या पित्याच्या शापाची आठवण होते. तेवढ्यात सुमंताकडून श्रीराम चित्रकुट पर्वतावर आहेत हे कळताच राम राम करत ते आपला प्राण सोडतात. अयोध्या शोकसागरात बुडते. भरत -शत्रुघ्नला आणण्यासाठी दूत पाठविण्यात येतो. भरत अयोध्येत येतो, तेव्हा त्याला अयोध्या अतिशय शांत भासते. त्याला नगरीतलं चैतन्य हरपले आहे असे वाटते. भरताला कैकयीकडून दशरथाच्या मृत्यूची आणि रामाच्या वनवासाची हकीकत कळते. आपल्याला राज्य प्राप्त होण्यासाठी आईने कुटील कारस्थान रचले हे कळताच तो कैकयीचा धिक्कार करतो आणि श्रीरामास पुन्हा अयोध्येस आणीन, अशी शपथ घेतो. भरत आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार करतो आणि रामांना अयोध्येत परत आणण्यासाठी चित्रकुटावर जाण्याचा निश्चय करतो.
कदाचित आपल्या सहवासात बुद्धिभेद करणारे असू शकतात पण त्यांच्या सांगण्यानुसार वागल्यास कैकयीसारखी अवस्था होते. ज्या पुत्रासाठी राज्य मागून घेतल्या जाते तो पुत्र राज्य नाकारतो आणि भाळी वैधव्य येते.
भरत-शत्रुघ्न, तिन्ही माता, वसिष्ठ ऋषी आणि अयोध्येचे मंत्री चित्रकुटावर जाण्यास निघतात. वाटेत त्यांची निषादराजगुहाची भेट होते. अयोध्येच्या लवाजम्यासहित भरत चित्रकुटावर पोहोचतो तिथे राम-भरत भेट होते. पिताश्रींच्या स्वर्गवासाची बातमी श्रीरामांना कळते. भरत श्रीरामांना अयोध्येत परत येण्याचा आग्रह करतो. श्रीराम पित्याचे आज्ञापालन महत्त्वाचे असे सांगतात आणि भरताला जन्म-मृत्यू मानवाच्या हातात नाही असे सांगून शोक आवरण्याचा उपदेश करतात. श्रीराम अयोध्येस परत येणार नाही हे लक्षात आल्यानंतर भरत श्रीरामांच्या पादुका मागतो आणि म्हणतो, “रामा, तुमच्या पादुका मी सिंहासनावर ठेवीन आणि मी नंदीग्राम येथे मुनिवेश धारण करून राज्याचा रक्षक म्हणून कारभार पाहीन.”
आजच्या युगात राज्यासाठी कोणत्या थराला जातात हे पाहिल्यानंतर भरताप्रती आदर शतगुणित होतो. राज्य मिळून ते नाकारणारा भरत श्रेष्ठ की सर्वस्वाचा त्याग करून वडीलबंधू समवेत वनवास स्वीकारणारा लक्ष्मण श्रेष्ठ ही तुलनाच करण अशक्य आहे, आपण या त्यागापुढे फक्त नतमस्तक व्हावं, या त्यागानं दीपून जावं.
भरत श्रीरामांच्या पादुका घेवून नंदिग्रामास परत येतो. श्रीराम चित्रकुटाहून दंडकारण्याकडे जातांना मार्गात अत्री ऋषींच्या आश्रमात पोहचतात. अत्री ऋषींची पत्नी अनुसूया सीतेस म्हणते, “वर माग!” भरताचे रामावर प्रेम असते. यावर सीता म्हणते, “माझ्या आयुष्यात राम आहे. त्यामुळे मला कशाचीच कमतरता नाही.”
श्रीराम, लक्ष्मण, सीता दंडकारण्यात प्रवेश करतात, वाटेत विराध राक्षसाचा वध करतात. शरभंग, सुतीक्षण ऋषींचा आशीर्वाद घेतात आणि इतर ऋषींच्या रक्षणाचे वचन देतात. श्रीराम जरी वनवासात असले तरी प्रजेचे रक्षण हे राजाचे कर्तव्य पार पाडतांना आपल्याला दिसतात. अगस्त्य ऋषी श्रीरामांना पंचवटी येथे आश्रम बांधण्यास सांगतात. वाटेत श्रीरामांची जटायूशी भेट होते, “मी सीतेचे रक्षण करीन” या जटायूच्या शब्दांनी श्रीराम निश्चिंत होतात.
|| बोला सियावर रामचंद्र की जय || भ्रमणध्वनी : ९४२२४०९२९८Email-bmphadke@gmail.com