यंदा १७ एप्रिल रोजी श्रीराम नवमी आहे. त्यादिवशी आपण श्रीरामाची जन्मकथा ऐकणार आहोत. पण राम हा केवळ उत्सवापुरता नाही तर त्याने आपले संपूर्ण आयुष्य व्यापून टाकले आहे. आयुष्य कंटाळवाणे वाटू लागले की आयुष्यात राम उरला नाही असे आपण म्हणतो. परंतु रामाशिवाय आपले आयुष्यच पूर्ण होणार नाही, याची प्रचिती आपल्याला फार उशिरा येते. जे रामायण रामकथेमुळे आपल्याला गोड वाटते, त्या रामायणाचे आपणही एक भाग असतो. नव्हे तर ते रामायण आपल्या आतच घडत असते. मग राम उरला नाही असे म्हणून कसे चालेल? या गोष्टीची जाणीव करून देणारी एक सुंदर कविता-
|| शरीरी वसे रामायण ||
जाणतो ना कांही आपणशरीरी आपुल्या वसे रामायण || धृ ||
आत्मा म्हणजे रामच केवळ,मन म्हणजे हो सीता निर्मळ !जागरुकता हा तर लक्ष्मण,शरीरी आपुल्या वसे रामायण ||१||
श्वास, प्राण हा मारुतराया,फिरतो जगवित आपुली काया |या आत्म्याचे करीतो रक्षणशरीरी आपुल्या वसे रामायण ||२||
नील जाम्बुवंत रक्त नसा या,फिरती शोधत जनक तनयागर्वच म्हणजे असतो रावणशरीरी आपुल्या वसे रामायण ||३||
रक्त पेशी त्या सुग्रीव, वानर,भाव भावना त्यातील वावरमोहांधता करी आरोग्य भक्षणशरीरी आपुल्या वसे रामायण ||४||
नखें केंस त्वचा शरीरावरती,शरीर नगरीचे रक्षण करतीबंधु खरे हे करती राखणशरीरी आपुल्या वसे रामायण ||५||
क्रोध म्हणजे कुंभकर्ण तो,शांत असता घोरत पडतोडिवचताच त्या करी रणक्रंदनशरीरी आपुल्या वसे रामायण ||६||
गर्वे हरले सौख्य मनाचेकांसाविस हो जीवन आमुचेसंकटी येई शरीर एकवटूनशरीरी आपुल्या वसे रामायण ||७||
मनन करता भगवंताचे,रक्षण होईल आरोग्याचेराम जपाचे अखंड चिंतनशरीरी आपुल्या वसे रामायण ||८||
|| श्री रामार्पणमस्तु ||