गर्भारपणात डोहाळे पुरवले असता, आई आणि बाळ दोघांची वृत्ती समाधानी राहते, असे म्हणतात. म्हणून गर्भवती महिलेचे सातव्या महिन्यात डोहाळजेवण करतात. हा संस्कार पूर्वापार चालत आला आहे. याच प्रथेनुसार गुरु वसिष्ठांनी दशरथ राजाला त्याच्या तिनही राण्यांचे डोहाळे विचारण्याची आज्ञा केली.
तीनही राण्या आपपल्या दालनात विश्रांती करत होत्या. दशरथाने विचार केला, पुत्रकामेष्टी यज्ञाच्या वेळी प्रसादरूपी पायस सर्वात आधी कौसल्या, सुमित्रा आणि नंतर कैकयीला दिले, त्यामुळे ती फूरगुंटून बसली होती. म्हणून डोहाळे विचारताना उलट क्रमाने पहिला मान कैकयीला देऊया.
आनंदी वातावरणात राजा दशरथ कैकयीच्या दालनात आला, तर कैकयी मंचकावर विस्कटलेले केस, इतरत्र फेकलेली आभूषणे, अस्ताव्यस्त वस्त्रानिशी रागावून बसली होती. तिचे रूप पाहून राजा दशरथ विचारात पडला. ती काय मागणार याची त्याला कल्पनाही नव्हती. राजाने तिला प्रेमाने जवळ घेत विचारले, `प्रिय कैकयी, आनंदाचे क्षण जवळ येत असताना तुझे रूप असे का? काही मनाविरूद्ध घडले आहे का? मी तुझे डोहाळे विचारण्यासाठी आलो आहे.' त्यानंतर धुसफुसत राणी कैकयी जे बोलली, ते ऐकून राजा दशरथ हवालदिल झाला. हे असले डोहाळे? आपल्या पुत्राला अयोध्येचे राज्य आणि कौसल्या पूत्राला वनवास? जे जन्माला अजून आलेही नाहीत, त्यांच्या दैवाचा निर्णय घेणारी ही कोण लागून गेली...राजा दशरथ पाय आपटीत तिथून निघून गेला.
एकीचे डोहाळे ऐकल्यानंतर आणखी दोघी काय मागतील याची त्याला धास्ती वाटू लागली. पण, गुरुआज्ञा मानावी लागणार. या विचाराने राजा दशरथ बाचकतच सुमित्रेच्या कक्षात आला. त्याला पाहताच सुमित्रा आदराने उठून उभी राहीली, तिने राजाला मंचकावर बसवले. तिचे आदरातिथ्य पाहून राजा शांत झाला. त्याने सुमित्रेला डोहाळे विचारले. ती म्हणाली, `राजन, माझ्या पूत्राने आपल्या वडिलांची किर्ती वाढवावी आणि आपल्या बंधूंची आज्ञा तसेच प्रजेचे रक्षण करावे, असा आशीर्वाद द्या.' राजा प्रसन्न झाला. तथास्तू म्हणत कौसल्येच्या दालनात गेला.
कौसल्या समाधीस्थ बसली होती. भगवन्नामात रंगून गेली होती. तिच्या चेहऱ्यावर गर्भारपणाचे तेज आगळेवेगळेच होते. राजा दशरथ तिचा मनोदय, तिचे डोहाळे विचारता झाला. ती काहीच बोलेना. राजा म्हणाला, 'अगं कौसल्ये, आता कुठे आपल्या आयुष्यात संतानप्राप्तीचे सुख येत आहे, अन्यथा इतके दिवस त्या रावणाने नुसता छळ मांडला होता, हे तू विसरलीस का? भानावर ये!'
रावणाचे नाव ऐकताच कौसल्येने सताड डोळे उघडले. ती रागाने लालबुंद झाली. तिच्या डोळ्यातून जणू ज्वाला बाहेर पडत होत्या. संतापाने ती थरथरू लागली आणि म्हणू लागली, मला धनुष्य द्या, त्यावर बाण चढवून मी त्या निर्दयी रावणाचा वध करणार आहे.'
कौसल्येचे रौद्र रूप पाहून दशरथ राजा घाबरला. त्याने गुरु वसिष्ठांना बोलावून घेतले. गुरु वसिष्ठ म्हणाले, `राजा, कौसल्येला कडक डोहाळे लागले आहेत. यावरून कळते, की तिच्या उदरी जन्म घेणारे बाळ सामान्य नाही, तर रावणाचा नायनाट करणारा अजातशत्रू अर्थात खुद्द त्रिभुवनपालक भगवंत आहे.'
गुरु वसिष्ठांची भविष्यवाणी ऐकून सर्वांना आनंद झाला आणि कालांतराने भविष्यवाणी खरी ठरली. कौसल्येला श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण-शत्रूघ्न आणि कैकयीला भरत असे दशरथाला चार पूत्र होतात. त्याचे वर्णन करताना गदिमा गीतरामायणात म्हणतात,
कौसल्या राणी हळू उघडी लोचने, दिपून जाई माय स्वत: पुत्र दर्शने,ओघळले आसू सुखे कंठ दाटला, राम जन्मला गं सखे राम जन्मला!