>> डॉ. भूषण फडके
पंचवटीत लक्ष्मण सुंदर पर्णकुटी बांधतो. एक दिवस रावणाची बहीण शूर्पणखा त्याठिकाणी येते आणि श्रीरामांना विवाह करण्याची गळ घालते. पण, आपण विवाहित आणि एकपत्नीव्रतधारी असल्याचे श्रीराम सांगतात, तेव्हा ती सीतेवर धावून जाते. श्रीरामांच्या इशाऱ्यासरशी लक्ष्मण शूर्पणखेचे नाक, कान कापून टाकतो. अपमानित शूर्पणखा रावणाने सीमा रक्षणासाठी नेमलेल्या खर दुषणकडे जाते आणि आपली दुर्दशा सांगते. खर दूषण चौदा हजार राक्षसांसहित श्रीरामावर आक्रमण करतात, पण पराक्रमी राम संपूर्ण राक्षस सैन्याचा नि:पात करतात आणि खराला ठार मारतात.
शूर्पणखा स्त्री असूनही उपद्रव देणारी होती म्हणून श्रीरामांनी लक्ष्मणाकरवी तिला शासन केले. आयुष्यात असे उपद्रवी कार्यात विघ्न आणतात, त्यांना आधी समजावून सांगावे, न ऐकल्यास त्यांना ते कोणीही असल्यास शासन करावेच अशी शिकवण श्रीराम या प्रसंगातून आपल्याला देतात.
शूर्पणखा रडत ओरडत रावणाकडे जाते. ती म्हणते, “रावणा, मी तुझी बहीण आहे हे माहीत असूनदेखील त्या मानवाने माझी विटंबना केली. त्याची पत्नी अतिशय सुंदर आहे. ती तुझीच राणी शोभेल. ती तुझी पत्नी व्हावी म्हणून मी त्याठिकाणी गेले तर लक्ष्मणाने माझे नाक, कान कापून मला कुरूप केले.” शूर्पणखेच्या शब्दांनी रावणाचा स्वाभिमान आणि अहंकार डिवचला गेला. तो सीतेच्या अपहरणाची योजना आखून मारीचाला या कामात सहाय्य करण्याची आज्ञा करतो.
एक दिवस राम सीता पर्णकुटीबाहेर असतांना एक सोनेरी मृग सीतेच्या दृष्टीस पडतो. तो मृग आणून द्या असे सीता श्रीरामांकडे हट्ट धरते. सोनेरी मृग असणे शक्य नाही, हे श्रीराम जाणून होते. पण हरिणाच्या रुपात राक्षस असल्यास त्याला ठार करून आपले धर्मरक्षणाचे कार्यात हातभार लागेल असे वाटून, जानकीच्या रक्षणार्थ पर्णकुटीत थांबण्याची लक्ष्मणास आज्ञा देऊन श्रीराम त्या हरिणाला आणण्यासाठी निघतात.
तो सुवर्णमृग म्हणजे मारीच श्रीरामांना पर्णकुटीपासून बराच दूर नेतो. आता हा आपल्या हातात लागत नाही म्हणून श्रीराम त्याच्यावर बाण सोडतात तेव्हा तो मायावी मारीच , “हे सीते धाव! हे लक्ष्मणा धाव! अशी किंकाळी फोडतो. ती ऐकताच सीता लक्ष्मणास रामाच्या रक्षणार्थ जाण्याची आज्ञा देते”. श्रीरामांवर कोणतेही संकट येऊ शकत नाही, हे लक्ष्मण सांगण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सीता म्हणते, “हे लक्ष्मणा, तुझ्या मनात माझ्याबद्दल लालसा उत्पन्न झाली आहे म्हणून तू श्रीरामांच्या सहायार्थ जाण्याचे टाळतो आहेस.”
ज्या भावासाठी सर्वस्वाचा त्याग केला त्याच्या भार्येकडून असे कटू वचन ऐकल्यानंतर लक्ष्मणाच्या डोळ्यात पाणी येते. तो आश्रमाच्या बाहेर एक रेषा ओढतो आणि या रेषेबाहेर न जाण्याचे बजावतो. लक्ष्मण लांब जाताच साधू वेशात दबा धरून बसलेला रावण पर्णकुटीच्या दरवाज्याजवळ येतो आणि भिक्षा मागतो. आपण भुकेले असून जमिनीवर गडबडा लोळण घेतो. सीतेला त्याची दया येते आणि सीता रेखा ओलांडून पर्णकुटीबाहेर येते. तोच रावण आपले मूळ रूप घेतो आणि सीतेला उचलून आकाशमार्गे लंकेकडे जायला निघतो. मारीचाला ठार करून प्रभू राम परत येत असतात तो त्यांना वाटेत लक्ष्मण भेटतो. जानकीची काळजी करत श्रीराम लक्ष्मणासह पर्णकुटीकडे त्वरेने परत यायला निघतात.
|| बोला सियावर रामचंद्र की जय ||
भ्रमणध्वनी : ९४२२४०९२९८Email-bmphadke@gmail.com