>>डॉ. भूषण फडके
हनुमान विशाल रुप धारण करुन उड्डाण करतात. वाटेत अडचणी येतात. त्यावर कधी लिनतेने तर कधी सामर्थ्याने मात करत समुद्र उल्लंघून हनुमान लंकेत पोहचतात. हनुमानास सीता अशोकवनात दिसते. हनुमान रामस्तुती करुन श्रीरामांनी दिलेली मुद्रिका देवून आपण श्रीरामाचे दुत आहोत हे सीतेस सांगतात. बलशाली हनुमान आपल्या पाठीवरुन सीतेस श्रीरामांकडे घेऊन जाण्याचा प्रस्ताव ठेवतो पण परपुरुषाच्या पाठीवरुन जाणे अयोग्य असे सीता म्हणते आणि प्रभू रामांचे कार्य राक्षसांचा संहार करुन धर्मसंस्थापना करणे तेही पूर्ण होणे आवश्यक असते म्हणून सीता या प्रस्तावास नकार देते.
शत्रुंचे बलाबल काय? हे पाहण्यासाठी हनुमान अशोकवनाचा विध्वंस करतो. रावणपुत्र अक्षयकुमाराचा वध करतो. इंद्रजिताच्या ब्रम्हास्त्रात स्वत:स हनुमान बंदी करुन घेतो. रावण हनुमानाचा वध करण्याची आज्ञा देतो पण दुतास मारणे योग्य नाही या बिभीषणाच्या सुचनेस मान्य करुन रावण हनुमानाची शेपटी पेटविण्यात सांगतो. पण हनुमान त्याच शेपटीने लंकादहन करतो आणि समुद्र ओलांडून परत येतो. किष्कींधेस परतल्यावर हनुमान सीतेचा चुडामणी रामांना देतो. सीता आपली चातकासारखी वाट पाहते आहे हे कळताच श्रीरामांचे डोळे भरुन येतात. दूत म्हणून लंकेत गेलेल्या हनुमानाने लंकादहन करून राक्षस सेनेचे मनोधैर्य खच्ची करण्याचे कार्य चोख बजावले आणि सीताशोधाचे असामान्य कार्य पार पाडले म्हणून हनुमान श्रीरामांचा “दासोत्तम” होतो.
विशाल वानरसेनेसह श्रीराम-लक्ष्मण समुद्रकिनारी पोहचतात. लंकेमध्ये रावणाचे मंत्री आपण इंद्रजिताच्या मदतीने सहज जिंकू अशा वल्गना करतात तेव्हा एका वानरवीराने लंकेचा केलेल्या नाशाची रावणाचा भाऊ बिभीषण आठवण करुन देतो. इंद्रजित बिभीषणाचा धिक्कार करतो तेव्हा बिभीषण श्रीरामांकडे शरणागत होऊन येतो. श्रीरामांसमोर वानरसेनेसह समुद्र उल्लंघन कसे करायचे हा यक्षप्रश्न उभा राहतो तीन दिवसांच्या प्रार्थनेनंतर सागर प्रसन्न होत नाही हे पाहून श्रीराम धनुष्यावर बाण सोडायला प्रत्यंचा ताणतात, तो सागरातील जीव तळमळू लागतात. धरणीकंपायमान होते आणि सागर देवता प्रत्यक्ष प्रगट होते. श्रीरामांच्या वानरसेनेत नल आणि निल हे विश्वकर्मांचे पुत्र असतात. ते सेतू बंधन करतील असे सागर श्रीरामांना सांगतो. असंख्य वानरवीर सेतुबंधनाच्या कामात मदत करतात. 100 योजने लांबीचा सेतु तयार होतो.
सर्व वानरवीर रणगर्जना करुन आसमंत दणाणून सोडतात. सर्व सेना सुवेल पर्वताच्या पायथ्याशी येते. शत्रुचे बलाबल पाहण्यासाठी श्रीराम, लक्ष्मण, बिभीषण, हनुमान आणि इतर वानरवीर सुवेल पर्वतावर चढतात. लंकेत रावणही श्रीरामाच्या सैन्याचे बल पाहण्यासाठी प्रासादावर असतो. रावणाला पाहताच सुग्रीव उड्डाण घेऊन रावणाशी द्वंद्व सुरु करतो. रावण सुग्रीवाचे तुंबळ युध्द होते. रावणाला पराजय दिसु लागताच तो मायावी शक्ती दाखवतो तेन्ह्वा सुग्रीव श्रीरामांकडे परत येतो. सुग्रीवाच्या या आततायी कृतीबद्दल श्रीराम सुग्रीवाची कानउघडणी करतात. सुग्रीव हा श्रीरामांच्या सेनेचा सेनापती. सेनापतीची कृती विचारी हवी. सेनानायकाने कसे वागावे हे श्रीराम सुग्रीवास सांगतात.
श्रीराम नेते होते.आपल्या नेतृत्वात त्यांनी सामान्य वानरांकडून सेतुबंधन,राक्षसांचा पराभव हे असामान्य कार्ये करून घेतली आणि सामान्यांनी मनात आणले तर असामान्य कार्ये करू शकतात हे जगाला दाखवून दिले. युध्दापूर्वी शांततेचा प्रयत्न म्हणून श्रीराम वालीपूत्र अंगदाला रावणाकडे शिष्टाई करण्यासाठी पाठवतात.
|| बोला सियावर रामचंद्र की जय ||
भ्रमणध्वनी : ९४२२४०९२९८Email-bmphadke@gmail.com
Ram Navmi 2021: उपद्रवी व्यक्तींना आधी समजावून बघा, अन्यथा शासन करा; रामायणाचा धडा