Rama Ekadashi 2024 Vrat in Marathi: चातुर्मास सुरू आहे. दिवाळी, दीपोत्सवाला अवघे काही तास राहिले आहेत. आकाशकंदील, रांगोळी, दिवे, पणत्या यांच्या खरेदीची लगबग सुरू आहे. प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळी सणाच्या एक दिवस आधी येणारी एकादशी ही अत्यंत शुभ, धन, समृद्धी आणि वैभवदायक मानली जाते. अश्विन महिन्याच्या वद्य पक्षात येणारी एकादाशी रमा एकादशी नावाने ओळखली जाते. दिवाळीच्या एक दिवस आधी येत असल्यामुळे या एकादशीचे महत्त्व अनन्य साधारण असेच आहे. रमा एकादशीचे महात्म्य, व्रतपूजन विधी आणि काही मान्यता जाणून घेऊया... (Ekadashi in October 2024)
यंदा २८ ऑक्टोबर २०२४ रोजी रमा एकादशी आहे. वर्षभरातील सर्व एकादशींना श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. मात्र, रमा एकादशीला श्रीविष्णूचा आठवा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचे पूजन केले जाते. घरातील धन, धान्य, समृद्धी वृद्धिंगत होते. रमा एकादशीला श्रीकृष्णांची विधिवत पूजा केल्यास सुख आणि सौभाग्य प्राप्त होते, असे सांगितले जाते. वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. मात्र, अश्विन महिन्यातील वद्य पक्षात येणाऱ्या रमा एकादशीला श्रीकृष्णाचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा प्रचलित आहे.
रमा एकादशीचा व्रत पूजन विधी
रमा एकदशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी पहाटे नित्यकर्म आटोपल्यानंतर एकादशी व्रत आणि श्रीकृष्ण पूजनाचा संकल्प करावा. श्रीकृष्णाची चौरंगावर स्थापना करावी. श्रीकृष्णाचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीकृष्णांना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीकृष्णाची आरती करावी. नैवेद्यामध्ये मिश्री, लोणी, मिठाई, खीर यांचा समावेश असल्यास उत्तम. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास गीता पठण करावे. या एकादशीची व्रतकथा ऐकवी. यथाशक्ती दान करावे, असे सांगितले जाते.
रमा एकादशीच्या दिवशी आवर्जून म्हणा श्रीकृष्णाची आरती
जय जय कृष्णनाथा । तिन्ही लोकींच्या ताता । आरती ओवाळीता । हरली घोर भवचिंता ।।धृ.।।
धन्य ते गोकुळ हो, जेथे करी कृष्ण लीला । धन्य ती देवकीमाता, कृष्ण नवमास वाहिला ।
धन्य तो वसुदेव, कृष्ण गुप्तपणे रक्षिला । धन्य ती यमुनाई, कृष्णपदी ठेवी माथा ।।१।।
धन्य ती नंद यशोदा, ज्यांनी प्रभु खेळविला । धन्य ते बाळगोपाळ, कृष्ण देई दहीकाला ।
धन्य ते गोपगोपी, भोगिति सुखसोहळा । धन्य त्या राधा-रुक्मिणी, कृष्णप्रेमसरिता ।।२।।