नवीन वर्षाचे नवीन संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत. अशातच नवीन घर, नवीन गाडी, प्रॉपर्टीची खरेदी हे स्वप्न प्रत्येकाचे असते आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने आयुष्याला नवीन वळण देणारे हे स्वप्न पूर्ण करावे असे वाटणेही स्वाभाविक आहे. मात्र सध्या पौष मास आणि मकर संक्रमणाचा काळ सुरु आहे. २९ जानेवारी रोजी पौष अमावस्येला (Paush Amavasya 2025) पौष मास संपेल आणि ४ फेब्रुवारीला रथसप्तमीला (Rath Saptami 2025) मकर संक्रमण पर्व संपेल. त्यामुळे या काळात कोणत्या नवीन वस्तूंची खरेदी टाळावी हे पं. रविराज क्षीरसागर गुरुजी यांच्याकडून जाणून घेऊ.
संक्रात येणे यामागील पौराणिक कथा :
पौराणिक कथेनुसार संकरासूर आणि किंकरासूर या राक्षसांचा वध करण्यासाठी देवी वाघावर आरूढ होऊन युद्ध करू लागली. तो काळ होता संक्रमणाचा, अर्थात त्यापूर्वी सगळे जण दैत्यांच्या जाचामुळे भयभीत झाले होते, मात्र देवीने हे संक्रमण अर्थात परिवर्तन घडवून आणले त्यावेळेस सूर्याचेही संक्रमण मकर राशीत सुरु होते. त्यावेळी देवीने दैत्यांवर मात केली आणि या संक्रमण काळाचा उत्सव साजरा होऊ लागला, तोच आताचा मकरोत्सव अर्थात मकर संक्रांती!
संक्रांत कशावर आली हे कसे ओळखावे?
मकर संक्रांतीच्या दिवशी येणारी तिथी, नक्षत्र, वार, योग, करण यांच्या अभ्यासावरून देवी कोणत्या वाहनावर बसून आली, तिने कोणत्या रंगाचे कपडे घातले आणि ती कोणत्या दिशेने आली हे अभ्यासले जाते आणि तिने निवडलेल्या गोष्टी, रंग, वाहन यांचा संक्रमण काळात त्याग केला जातो, यालाच त्या वस्तूंवर संक्रात येणे असे म्हटले जाते.
यंदा संक्रांत कशावर आली?
यंदा संक्रात पुनर्वसू नक्षत्रात, वाघावर बसून आली आहे, पिवळे वस्त्र धारण केले आहे, कपाळावर केशरी टिळा लावला आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे.
कोणत्या वस्तूंची खरेदी टाळली पाहिजे?
संक्रांत ज्यावर विराजमान आहे त्या वस्तूंची खरेदी टाळली पाहिजे. म्हणजेच देवी पिवळे वस्त्र घालून आली आहे म्हणून संक्रमण काळ संपेपर्यंत पिवळ्या वस्तूंची खरेदी टाळायला हवी. त्यात मुख्यत्त्वाने सोने खरेदी रथसप्तमी नंतरच करायला हवी. तसेच प्रॉपर्टी संबंधी व्यवहाराची बोलणी या काळात करता येतील मात्र खरेदी करायची असल्यास ४ तारखेनंतरच केलेली चांगली. हीच बाब गाडी खरेदी तथा विवाह आणि अन्य शुभ कार्याबाबतीत लागू होईल.
मकर संक्रांतीबाबतीत संपूर्ण माहितीसाठी दिलेल्या लिंकवर संपूर्ण व्हिडीओ अवश्य बघा.