Ratha Saptami 2024: मराठी वर्षातील माघ महिना विशेष महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेकविध प्रकारचे सण-उत्सव साजरे केले जातात. माघ महिन्यात श्रीगणेश, सरस्वती देवी, सूर्यदेव, भीष्म, श्रीविष्णू, श्री विश्वकर्मा, संत गाडगेबाबा, दत्तगुरू, श्री गजानन महाराज, समर्थ रामदास स्वामी, महादेव शिवशंकर आदींचे स्मरण, पूजन केले जाते. माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्य पूजन करण्याची प्रथा आहे. सन २०२४ मध्ये शुक्रवार, १६ फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे.
सूर्य स्वयंप्रकाशी आहे. सर्वांत तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तीवान, बुद्धीवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे. सृष्टीचा जगत्चालक असून, तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे. सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे, असा संदर्भ रथसप्तमीला आहे. सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी. भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलेले आहे. रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात. रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते.
माघ शुद्ध सप्तमी प्रारंभ: १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजून १२ मिनिटे.
माघ शुद्ध सप्तमी समाप्ती: १६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ०८ वाजून ५४ मिनिटे.
भारतीय संस्कृतीमध्ये सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे रथसप्तमीचे पूजन १६ फेब्रुवारी २०२४ रोजी करावे, असे सांगितले जाते. रथसप्तमीला मकर संक्रांतीनिमित्त सुरू होणारे हळदी-कुंकू समारंभ समाप्त होतात. अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात. सूर्य ग्रहांचा राजा असून, त्याचे स्थान नवग्रहांमध्ये वरचे आहे.
रथसप्तमीला सूर्यपूजा कशी करावी?
रथसप्तमी हा अदिती आणि कश्यप यांचा पुत्र 'सूर्य' याचा हा जन्मदिवस आहे, असे मानले जाते. या दिवशी सूर्य पूजन केले जाते. सूर्य पूजन करण्यासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करावे. छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य दिले द्यावे. रथसप्तमीदिनी तुळशीपुढे सात घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्यरथाचे चित्र काढून महिला त्याचे पूजन करतात. अंगणात दीप प्रज्वलन करून भाताचा नैवेद्य सूर्याला दाखविला जातो. सूर्यरथाला असणारे सप्त अश्व आठवड्यातील सात वार दर्शवतात. रथाची बारा चाके बारा राशींचे प्रतिक आहे, असे मानले जाते.
सूर्योपासक मंडळींमध्ये हे व्रत आवर्जून केले जाते. रथसप्तमीच्या दिवशी काहीही करणे शक्य नसेल तर निदान बारा वाजण्यापूर्वी यथाशक्ती गायत्री मंत्राचा जप, सूर्याचे ध्यान, नामस्मरण, अर्घ्य द्यावे. भारतात विविध प्रांतांत रथसप्तमीला जयंती सप्तमी, मंदार सप्तमी, विधान सप्तमी, विशेष सप्तमी, पुत्रसप्तमी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. संपूर्ण वर्षातील सप्तम्यांपैकी या सप्तमीला विशेष महत्त्व असल्यामुळे तिला ‘महासप्तमी’ म्हणूनही गौरविले गेलेले आहे.