लॉकडाऊन हा शब्दही आपल्यापैकी अनेकांना कोरोनापूर्वी माहीतही नव्हता. परंतु या एका शब्दाने अनेकांच्या संसारावर जणू वरवंटा फिरवला. कोणाचा रोजगार गेला तर कोणाची पगारकपात झाली. याच काळात एकीकडे माणुसकीचे दर्शन घडले तर दुसरीकडे माणसांची खरी रूपे उघडकीस आली. याच काळात अनेकांना आपल्या कर्माचा मोबदलादेखील मिळाला. जे करावे, ते भरावे या उक्तीनुसार अनुभव घेतला. त्यातलीच एक गोष्ट...
लॉकडाऊन मुळे एका गृहस्थाचे वर्क फ्रॉम होम सुरू होते. त्याच्या पत्नीचेही घरून काम सुरू झाले. त्यावेळेस सोसायट्यांमध्ये बाहेरच्या कोणाला प्रवेश नसल्यामुळे कामाला येणाऱ्या मावशींना सक्तीने रजा द्यावी लागली. नवरा बायको दोघेही मिळून मिसळून घरकाम आणि ऑफिसकाम सांभाळत होते. त्यावेळेस नवऱ्याने विचार केला, आपण सगळे काम सांभाळू शकत आहोत, तर आपल्या कामवाल्या मावशींना भरपगारी रजा देण्याची काय गरज? लॉक डाऊन सुरु आहे तोवर त्यांना कामावरून काढून टाकू, म्हणजे आपले पैसे वाचतील. बायकोने या गोष्टीला विरोध केला, पण नवऱ्याने ऐकले नाही. परस्पर फोन करून कामवाल्या मावशींना नकार कळवला. मावशींनी खूप मनधरणी केली. पण पलीकडून फोन ठेवून देण्यात आला. नवऱ्याचे हे वागणे बायकोला पटले नाही. वाद नको म्हणून ती शांत राहिली.
सर्वकाही ठीक सुरू होते. घरबसल्या भाजीपाला, घरसामान, औषध ऑर्डर देऊन मिळत होते. बायकोला कामवाल्या मावशींची काळजी लागून राहिली होती. तिच्या संसाराला आर्थिक हातभार लागावा म्हणून ती मावशींच्या मुलाच्या मोबाईलवर नवऱ्याच्या नकळत ऑनलाईन पैसे पाठवत होती. त्याचवेळेस नवरा मात्र आपल्याला कोणाचीच गरज नाही अशा भ्रमात वावरत होता.
एक दिवस कामाला सुरुवात करण्यासाठी नवऱ्याने लॅपटॉप सुरु केला आणि रोजच्याप्रमाणे ईमेलउघडला, तर त्यातील एक ईमेल वाचून त्याची पायाखालची जमीनच सरकली. त्याने बायकोला जोरात हाक मारली आणि लहान मुलासारखा रडू लागला. बायकोने काय झालं असं विचारल्यावर, तिला ईमेल दाखवत तो म्हणाला, 'कंपनी नुकसानीत जात असल्याने काही कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढत आहे आणि त्या कर्मचाऱ्यांच्या यादीत माझे नाव पहिले आहे.'
आता आपले काय होईल, घर खर्च कसा चालेल, घरासाठी घेतलेले कर्ज कसे फिटेल, औषध पाणी कसे होईल अशा सगळ्या विचारांनी त्याच्या डोक्यात थैमान घातले. त्यावेळेस बायकोने त्याला शांत करत म्हटले,'वाईट वाटून घेऊ नकोस. नोकरी जाणाऱ्या प्रत्येकाची अवस्था अशीच होते आणि त्यालाही अशाच अनंत अडचणींचा सामना करावा लागतो.'
बायकोचे हे शब्द ऐकल्यावर नवऱ्याच्या डोळ्यासमोर कामवाल्या मावशींचा चेहरा उभा राहिला. तो हात जोडून बायकोला म्हणाला, मी आधी मावशींची माफी मागतो आणि त्यांचा आतापर्यंतचा पगार देतो. मी त्यांच्याशी जे वागलो, तेच माझ्या बाबतीत घडले. मी माझी चूक सुधारली, तर कदाचित माझीही नोकरी परत मिळेल.'
त्यावर बायकोने कानउघडणी करत म्हटले, 'एवढ्या संकटातही तुझा स्वार्थ सुटत नाही. स्वतःची नोकरी परत मिळावी म्हणून तू मावशींना पगार देणारेस? याउलट पश्चात्ताप होऊन त्यांची माफी माग. त्यांचा पगार मी कधीच दिला आहे. तुझी चूक सुधार आणि या प्रसंगातून धडा घेत शहाणा हो. आपण जे वागतो त्याचे फळ आपल्याला मिळते. म्हणून नेहमी चांगले कर्मच करत राहा.