ही गोष्ट आहे एका लेखकाची. त्याने आपल्या पुस्तकात ही गोष्ट लिहून ठेवली आणि बालपणापासून आपल्याकडून घडलेल्या चुकीची जाहीर कबुलीसुद्धा दिली. काय होती ती चूक, जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत गोष्ट वाचा...
गरीब घरात जन्मलेल्या छोट्याशा मुलाचा सांभाळ त्याच्या आईने केला. आईचे अर्धांग भाजलेले असल्यामुळे ती विद्रुप आणि क्रूर दिसत असे. तिच्या याच रूपामुळे तिला नवऱ्याने सोडून दिले होते. तिच्या भयावह दिसण्यामुळे तिला कामही मिळेना. बांधकाम मजूर म्हणून काबाड कष्ट करत तिने संसारगाडा ओढला. मुलाला शिक्षण दिले, मोठे केले.
आईचे सगळे कष्ट पाहत असूनही मुलाला आपल्या आईबद्दल कधीच आत्मियता वाटली नाही. कारण ती इतर चाघचौघांच्या आईसारखी सुंदर नव्हती. उलट भाजलेल्या चेहऱ्यामुळे लोंबकळलेली त्वचा, निकामी झालेला डोळा, बेढब ओठ पाहणे मुलगा टाळत असे. त्याने कसेबसे शिक्षण पूर्ण करून शहराबाहेर जायचे ठरवले. तिथेच नोकरी सुरू केली आणि संसारही थाटला.
आई मुलाच्या आठवणीने व्याकुळ होत असे. मुलाने आईशी नाते तोडले परंतु बालपणीचे उपकार आठवून दरमहा ठराविक रक्कम तो पाठवित असे. अनेक वर्षे लोटली, परंतु त्याने कधी प्रत्यक्ष भेट तर दूरच पण चौकशीचा साधा फोनही केला नाही.
एक दिवस मनीऑर्डर परत आली. त्याबरोबर आईच्या मृत्यूची वार्ताही कळली. क्षणभर तो स्तब्ध झाला. आईला आयुष्यभर पाहिले नाहीच, शेवटी तिला निरोपही आपण दिला नाही. या पश्चात्तापाने त्याने गावाकडे धाव घेतली. आईच्या झोपडीवजा घराला कुलूप होते. गावकरी कुत्सित नजरेने मुलाकडे पाहत होते. मुलगा शरमेने मान खाली घालत शेजाऱ्यांकडे गेला, चावी घेतली आणि घरात शिरला. त्याला बालपणीचे दिवस आठवले. घरात मोजकेच सामान होते. एक ट्रंक होती आणि त्यात एका बरणीत पैसे साठवले होते. बरणीखाली एक चिठ्ठी होती. त्यात लिहिले होते,
`बाळा, आज ना उद्या तू नक्की येशील त्यावेळेस मी जिवंत असेन की नाही माहित नाही. मी ही अशी अडाणी, तू मला भेटायला यावं, तुझा प्रपंच दाखवावा एवढं माझं भाग्य नाही. पण बNयाच गोष्टी तुला सांगायच्या होत्या, त्या न ऐकताच तू निघून गेलास. म्हणून शेजारच्या मुलाला सांगून ही चिठ्ठी लिहून घेत आहे.
'तू ज्या रुपावरून माझा तिरस्कार करत आलास ती माझी अवस्था तुझ्यामुळे झाली. तान्हा बाळ असताना तू रांगत रांगत चुलीजवळ गेलास आणि चुलीतले सारण ओढू लागलास. तुला वाचवण्यासाठी मी धावले, तेव्हा माझ्या साडीने पेट घेऊन मी अर्धी जळाले. पण तू वाचलास...हेच समाधान. तुझे बाबा सोडून गेले. कष्टात दिवस काढले. हे सगळं सांगायला सवड मिळाली नाही. जेव्हा हात पाय थकून जागी बसले, तेव्हा ऐकायला तू जवळ नव्हतास. तू पाठवलेले पैसे मी वापरले नाहीत. या बरणीत जमा करून ठेवले आहेत. तुझ्या मुलांना यातून खाऊ दे. तो तूच तुझ्या पैशांनी दिला आहे सांग, नाहीतर त्यांना चांडाळणीसारख्या दिसणाऱ्या आजीकडून मिळाल्याचे सहन होणार नाही. नेहमी सुखी राहा. देव न करो, तुझ्यावर कधी असा प्रसंग येवो आणि कधी आलाच तर लक्षात ठेव, रंग, रूप, तारुण्य, वार्धक्य हे क्षणभंगूर आहे, जो माणसाचे मन जाणतो, तोच माणसाची खरी किंमत ओळखू शकतो.'
पत्र वाचून मुलगा धाय मोकलून रडू लागला त्यावेळेस त्याचे अश्रू पुसायला ट्रंकेत ठेवलेली आईची साडीच कामी आली...!