आपल्या धर्मशास्त्रात पाप आणि पुण्याच्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या पूर्णपणे योग्य आहेत. पाप पुण्याचे परिणाम या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भोगून पूर्ण करावे लागतात आणि जर पूर्ण झाले नाहीत तर पुढच्या जन्मातही भोगावे लागतात. पापाची व पुण्याची आपापसात वजावट होऊन उरलेले पापपुण्य भोगावे लागते. अशी एक चुकीची समजूत लोकांमध्ये दिसून येते. पाप पुण्याची बेरीज वजाबाकी कधीच होत नाही.
प्रत्येक मनुष्यात दोन प्रवृत्ती वास करीत असतात. एक सात्विक वृत्ती व दुसरी राक्षसी वृत्ती. मनुष्याचे मन मुळातच आळशी असते. त्यात ते पुन्हा पुन्हा विकाराकडे धाव घेते. पाप कर्मामुळे व्यक्तीचे विचार व वृत्ती पापकर्माकडे वळतात. सुधारण्याची शक्यता फारच कमी राहते. पापाची फेड सर्व जन्मामध्ये व योनीमध्ये सांगितली आहे. त्यामुळे पशु पक्ष्यांनाही पाप पुण्य फेडावे लागते. फक्त पाप कोणते आणि पुण्य कोणते हे त्यांना कळत नाही. म्हणूनच मनुष्य जन्म मिळाल्यावर नितीनियमानुसार वागावे व योग्य धर्माचरण करावे. इतर जन्मात अगर योनीत पापकर्म घडले असल्यास ते भोगून संपवून पुण्यकर्माचा साठा करावा.
देवाच्या दृष्टीने सर्व लोक समान आहेत. देवाचा न्याय कधीच चुकत नाही. जो पुण्य कर्म करील त्याला चांगल्या कुळात जन्म मिळेल. पाप कर्मे केलेल्यांनाही जन्म मिळतो, पण तो फक्त दु:खं भोगण्यासाठी असतो आणि हेच नेमके लोकांना कळत नाही. देवाच्या दृष्टीकोनातून सगळे सारखेच असले तरी जन्म मिळताना पाप पुण्याचा, पात्रतेचा विचार झालेला असतो. तेव्हा देवाच्या कार्यात आपण हस्तक्षेप करू नये. विनाकारण देवाला दोष देऊ नये. कोणत्याही कुळात का असेना, मनुष्य जन्म मिळाल्याबद्दल आपण देवाचे आभारच मानायला हवे.
काही लोकांची कल्पना असते की, त्याचा जन्म हा केवळ मागील जन्मांची पापे फेडण्याकरीता झाला आहे. म्हणून ते उद्धाराचा कोणताही प्रयत्न न करता चाकोरीबद्ध जीवन जगत असतात. परंतु थोडेजरी प्रयत्न केले तरीही पापे फेडताना त्यांना सत्पुरुषाचे दर्शन घडू शकते. पापक्षालनासाठी व मानसिक समाधानासाठी मनुष्य तीर्थयात्रा करतो, परंतु केलेल्या अपराधातून त्याची सुटका होऊ शकत नाही. सिद्ध पुरुषांनी मनात आणले तर यातून त्यांची सुटका होऊ शकते, तसा त्यांचा अधिकार असतो.
मानवाकडून चुका होतात, तर काही वेळेला नकळत मोठे अपराधही घडतात. काहींच्या मनात पश्चात्तापाची भावना असते. परंतु योग्य परिमार्जन होत नाही. म्हणून एकप्रकारची बोच असते. अशा वेळेस धर्मग्रंथवाचन केल्याने फायदा होतो. कोणत्याही धर्माचे धर्मग्रंथ याच तत्त्वावर आधारित आहेत. धर्मग्रंथांचा अंतिम उद्देश लोकांना नितीनियमांप्रमाणे वागायला शिकवणे, जर चूका झाल्या असतील तर पापक्षालनाचा मार्ग दाखवणे हाच असतो. आपल्याकडून जराशीही चूक झाली असेल तर श्रीगुरुंचे अथवा देवाचे नामस्मरण करा. या गोष्टी आत्मसात करा. सतत नामस्मरणाची सवय लागल्यावर हातून पापकर्मे घडत नाहीत.
व्यवहारात वागताना आपापला नोकरी व्यवसाय सांभाळताना प्रसंगी खोटे बोलावे लागते, अशा वेळी त्या त्या खूर्चीची जी कर्तव्ये असतील ती प्रामाणिकपणे पूर्ण करावीत. त्यामुळेच कोणाला नोकरीवरून कमी करणे, कोणाला कायद्यानुसार शिक्षा देणे ही कृत्ये, पापे राहत नाहीत. उलट या कृत्याला सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून दिलेला न्याय म्हणतात.
ज्याप्रमाणे तुमचे पुण्याचे प्रमाण वाढेल, त्याप्रमाणे पुन्हा जन्म घेणे, चांगल्या कुळात जन्म घेऊन उद्धार करणे. अनेक जन्म पुण्य उपभोगित राहणे म्हणजे त्यासाठी पुन्हा जन्म घेणे आले. त्यासाठी भगवंताला सुचवायचे आहे. याठिकाणी पुण्य फार वाढवू नये आणि पापही वाढवू नये. यासाठी निष्काम कर्म करत राहणे हाच मध्यम दुवा ठरतो.