आज मंगळवार आणि पुष्य नक्षत्र असा मंगल योग जुळून आला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार आकाशात एकूण सत्तावीस नक्षत्र असतात. आणि त्यातील पुष्य नक्षत्र हे सर्वांत शुभ नक्षत्र मानले जाते.या नक्षत्राला 'तिष्य' किंवा 'अमरेज्य' या नावांनीही ओळखले जाते.'तिष्य' म्हणजे शुभ मांगलिक नक्षत्र तर 'अमरेज्य' म्हणजे देव ज्याची पूजा करतात असे नक्षत्र.शनि ग्रह हा या नक्षत्राचा स्वामी मानला जातो.हे नक्षत्र इतके शुभ मानले जाते की या नक्षत्रात विवाहाव्यतिरिक्त कोणतेही शुभ कार्य पंचांग न बघताही करता येते.सर्व अशुभ योग दूर करण्याची शक्ती पुष्य नक्षत्रात आहे.आजच्या दिवशी कोणत्या गोष्टींचा आरंभ करणे शुभ मानले जाते, ते जाणून घेऊया.
१. पुष्य नक्षत्रात जर गुरु, शनि आणि चंद्राचा प्रभाव असेल तर सोने, लोखंड (वाहन,अवजार इ.) आणि चांदीच्या वस्तू खरेदी करता येतील. या कालावधीत केलेली खरेदी अक्षय्य म्हणजे कधीच संपुष्टात येत नाही, असे मानले जाते.
२. या नक्षत्रात हस्तकला, चित्रकला, नवीन विषयांचा, भाषांचा अभ्यास सुरू करणे चांगले मानले जाते. मंदिराचे बांधकाम, घर बांधणी इत्यादी गोष्टीही या काळात शुभ मानल्या जातात.
३. गुरु-पुष्य किंवा शनि-पुष्य योगाच्या वेळी, लहान मुलांचा उपनयन संस्कार करतात. त्यानंतर प्रथमच विद्याभ्यासाठी मुलांना गुरुकुलात पाठविले जाते.
४. या दिवशी आपण वह्या-पुस्तकांचीदेखील पूजा देखील करू शकतो. तसेच या दिवसापासून नवीन कामांचा प्रारंभ करता येतो. जसे की, दुकान उघडणे, व्यवसाय सुरु करणे किंवा इतर कोणतेही काम.
५. आजच्या दिवशी दीर्घ काळासाठी पैशांची गुंतवणूक केल्यास भविष्यात चांगले परिणाम मिळतात. या शुभ दिवशी महालक्ष्मीची पूजा केल्यास, पिंपळ किंवा शमीच्या झाडाची पूजा केल्यास विशेष व इच्छित फळ प्राप्त होते.