कधीही कोणाचे केलेले उपकार विसरू नयेत, असे म्हणतात. परमेश्वराने हा आदर्श त्याच्या कृतीतून घालून दिला आहे. जसे की कृष्णावतारात त्याच्या मुकुटात सदोदित खोवलेले मोरपीस! त्यात केवळ कृष्णाची रसिकता नाही, तर कृतज्ञ भाव दडलेला आहे. हा कृतज्ञ भाव कोणाप्रती? हे जाणून घेण्यासाठी वाचा ही छानशी गोष्ट...
वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली, तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले. पण पाणी कोठेच मिळेना. सर्वत्र जंगलच दिसत होते. तेव्हा श्रीरामाने पृथ्वी मातेला प्रार्थना केली की, जेथे कोठे पाणी असेल तेथे जाण्याचा मार्ग आम्हांला दाखव. तेव्हा एक मोर तेथे आला व श्रीरामास म्हणाला, येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे.चला मी आपणास दाखवतो.पण मार्गात मी उडत उडत जाईन आणि आपण चालत येणार, त्यामुळे चुकामूक होऊ शकते. म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईन. त्यामुळे आपणास मार्ग सापडेल व आपण जलाशयाजवळ पोहचाल.
मोरपंख एका विशेष काळी व एका विशेष ऋतुमध्ये आपणहून तुटून पडतात. पण मोराच्या इच्छेविरूद्ध पंख काढले तर त्याचा मृत्यु होतो. रामकथेतल्या मोराचा काळ जवळ आला नव्हता, पण प्रभू कार्यार्थ त्याने पंख काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याचा मृत्यूचा जवळ आला. जलाशयाजवळ प्रभू रामचंद्र पोहोचले तेव्हा मोर म्हणाला की, 'मी किती भाग्यशाली आहे की, जो या सृष्टीची तहान भागवतो, त्या प्रभूची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले. माझे जीवन धन्य झाले.आता मरताना माझी काही इच्छा शेष राहीली नाही.'
तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने मोराला म्हटले की, माझ्यासाठी जे सुंदर मोरपंख तू अकाली काढून मार्गात टाकलेस, त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहेत व जो ऋणानुबंध झाला आहे, हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्की फेडीन.
त्यानुसार पुढच्या अवतारात, म्हणजे श्रीकृष्ण अवतारात प्रभू रामांनी आपल्या मुकुटावर मयूरपंख धारण करुन दिलेल्या वचनानुसार मयुराचे ऋण व्यक्त केले. शिवाय त्याच्या ऋणात कायम राहण्यासाठी आहे त्याचा मान वाढवण्यासाठी मोरपंखांना आपल्यापासून कधीच विलग केले नाही.
भगवंताप्रमाणे आपणही आपल्यावर केलेल्या उपकरांची जाणीव ठेवून कृतज्ञतेने वागले पाहिजे. माता, पिता, गुरु, नातेवाईक, समाज, निसर्ग या सर्वांचाच आपल्या जडण घडणीत मोठा वाटा आहे. शिवाय ज्या परमेश्वराने आपल्याला जन्म दिला, श्वास दिला, निरोगी, सुदृढ शरीर दिले, त्याच्या ऋणात कायम राहिले पाहिजे.