एकदा एक लहान मुलगी आपल्या आजोबांशी धावण्याची स्पर्धा लावते, आजोबा हळू हळू धावतात, मुलगी जिंकते. ती आनंदाने येऊन बाबांना सांगते, 'मी आजोबांना हरवलं!' तेव्हा तिचे बाबा तिला समजावतात, 'बाळा, तीच स्पर्धा माझ्याशी लावलीस तर तू हरशील, पण आजोबांनी तुला जिंकण्याचा आनंद मिळावा म्हणून ते ही स्पर्धा हरले. तुझा आनंद त्यांना पाहता आला आणि ते जिंकले. त्यामुळे प्रत्येक वेळी जिंकल्यावरच आनंद होतो असं नाही, तर हरल्यावरही जिंकता येतं.
गौर गोपाल दास सांगतात, 'बऱ्याचदा लग्नाळू मुलांना गमतीने सांगितलं जातं, कारण नसतानाही सॉरी म्हणायला शिक, तरच संसार सुखाचा होईल.' यात कमीपणा घेणं किंवा कमीपणा वाटणं ही बाब नाहीच, ज्यांना नातं जपायचं असतं ते भांडण ताणत बसत नाहीत. रबर दोन्ही बाजूंनी ताणलं तर तुटून जाईल, नात्याचंही तसंच आहे, जितकं ताणाल तेवढं ते तुटेल. म्हणून एकाला राग आलेला असताना दुसऱ्याने शांतपणे परिस्थिती हाताळणं गरजेचे आहे. त्याक्षणी पत्करलेली हार नात्याला जिंकवते.
आपल्यापैकी प्रत्येकाला आपला मुद्दा खरा करण्याची खुमखुमी असते. मी म्हणेन तीच पूर्व, असाही हट्ट असतो. त्यामुळे वाद विकोपाला जातो आणि तणाव वाढतो. अशा भांडणात माघार घेण्याची तयारी कोणीच दाखवत नाही. अकारण इतर लोकही त्यात भरडले जातात. याउलट एकाने माघार घेतली तरी बाकीच्यांना होणारा त्रास टाळता येऊ शकतो. त्यामुळे दर वेळी जिंकणं हे उद्दिष्ट न ठेवता, वेळ, काळ, पैसा आणि महत्त्वाचं म्हणजे नातं जपायचे असेल तर माघार घ्यायला शिका, कायम जिंकत राहाल!
व्हॅलेंटाईन वीक येतोय, या काळात प्रेमाला बहर येईल, पण प्रेम कायमस्वरूपी टिकवून ठेवायचे असेल आणि केवळ नवरा बायकोचे नाते नाही तर आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र, मैत्रीण, सहकारी, बॉस, शेजारी या सगळ्याच टप्पयावर ठराविक मर्यादेनंतर भांडणातून माघार घ्यायला शिका!