चांगल्या गोष्टी चटकन कोणाच्याही नजरेस येतात, नजरेत भरतात. पाहणाऱ्याला त्याबद्दल असूया वाटते, मत्सर वाटतो आणि त्याच्या नकारात्मक लहरी सकारात्मक व्यक्तीला त्रासदायक ठरू शकतात. यालाच दृष्ट लागणे असे म्हणतात. यावर उतारा म्हणून, आपल्याकडे दृष्ट काढण्याची परंपरा आहे.
वास्तुशास्त्रानुसार मीठ नकारात्मक लहरी शोषून घेते. म्हणून घरातही कानाकोपऱ्यात मीठ ठेवण्याचा सल्ला दिला जातो. दृष्ट काढतानाही मीठाचा वापर केला जातो. तसेच, फोडणीपात्रात मोहरी पडल्यावर चटचटा तडकायला सुुरुवात करते. या दोहोंचा एकत्रित आवाज ऐकल्याने, मीठ-मोहरी जळल्याच्या वासाने दृष्ट जळली, असा निष्कर्ष काढला जातो.
दृष्ट काढण्याच्या पद्धती बऱ्याच आहेत. मीठ-मोहरीने, फुला-पानांनी, पोळी किंवा भाकरीच्या तुकड्याने, पाण्याने, केरसुणीने, चपलेने, पैशाने आणि आणखीही बऱ्याच तऱ्हेने. पद्धती निरनिराळ्या असल्या, तरी त्यामागील हेतू अजिबात वाईट नाही.
खुद्द माऊलींनी पसायदान मागताना, 'जे खळांची व्यंकटी सांडो' असे म्हटले आहे. याचाच अर्थ, जे वाईट वृत्तीचे लोक आहेत, त्यांच्यातील वाईट वृत्ती नष्ट होवो, म्हणजे उरेल ती व्यक्ती चांगलीच असणार आहे. त्याचप्रमाणे दुष्ट-दुर्जनांची वाईट दृष्टी जळली, की अन्य कोणाचेही वाईट होणार नाही. म्हणून तर, लहान बाळ असो, नाहीतर वर-वधू त्यांना काजळाची तीट लावली जाते. त्यांच्या सुखाला कोणाची दृष्ट लागू नये, हीच त्यामागची सद्भावना. मात्र या सद्भावनेपलीकडे जाऊन दुसऱ्याचे वाईट होवो, या विचाराने प्रेरित होऊन केलेले मंत्र-तंत्र अंधश्रद्धेला पूरक ठरतात. त्यामुळे आपण केवळ सद्भावना जपावी.
'आल्या-गेल्याची, वाटसरूची, पशू-पक्ष्यांची, गुरा-ढोरांची, भुता-खेतांची, मांत्रिकांची आणि या विश्वातील कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तींची दृष्ट लागली असेल, तर ती निघून जाऊ दे’, असे म्हणत आपल्या घरातील ज्येष्ठ बायका मुलांची, सुनांची, जावयाची मंगल प्रसंगी, वाढदिवशी, समारंभाच्या दिवशी दृष्ट काढतात. आजारी व्यक्तीचीही दृष्ट काढली जाते. त्या मानसिक आधाराने आजारी व्यक्तीलाही बरे वाटते.
ज्याने सर्वांना दृष्टी दिली, त्या परमेश्वराचीही आज्या-पणज्या फुला-पाण्याने दृष्ट काढतात. आता सांगा, देवाला का कोणाची दृष्ट लागणार आहे? तरीदेखील, उत्सवप्रसंगी देवाची दृष्ट काढण्याची प्रथा काळानुकाळ चालत आलेली आहे. असेच एक, संत जनाबाईचे काव्य वानगीदाखल-
कोणाची झाली दृष्ट माझ्या पंढरीराया,उतरीते लिंब लोण, कोमेजली काया।कर लेवुनि कटेवरी, उभा भिवरेच्या तिरी,भक्तांना भेटावया, माझा पंढरीराया।नाना परीचे लेणे लेशी गवळणी, आली राधिका पहाया, माझ्या पंढरीराया।साधू-संत येती जाती, दृष्ट तुजला लावीताती,निरसली मोहमाया, माझ्या पंढरीराया।हाती घेऊनी मोहऱ्या मीठ, जनाबाई काढी दृष्ट, लावीते गाल बोट, माझ्या पंढरीराया।
अशी आपुलकीची भावना जिथे असते, तिथे कोणाची दृष्ट लागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण दुर्दैव, आता ना आपुलकीची माणसं राहिली, ना दृष्ट काढून कानशीलावर बोट मोडणारे हात! संस्कृती-परंपरेलाच दृष्ट लागली वाटतं...!