एक जाज्वल्य दत्तावतार म्हणजे सन १८५४ ते १९१४ ह्या काळात होऊन गेलेले परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज होय. नरसोबाच्या वाडीला श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज्यांचे स्मृतिमंदिर आहे. नरसोबा वाडीचे दत्तस्थान हेच श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराजांचे प्रेरणास्थान होय. त्यांच्या सान्निध्यात राहून अनेक दत्त भक्तांनी स्वतःचा लौकिक आणि पारमार्थिक उत्कर्ष करून घेतला. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सद्विचाराचे कण वेचून आपणही पावन होऊया.
टेंबे स्वामी सांगतात, मूर्तीपूजा हा केवळ उपचार नसून ते देवाशी एकरूप होणे आहे. जी व्यक्ती मन लावून मूर्तीपूजा करते, त्या परमेश्वराची मूर्ती त्या भक्ताची अंकित होते. एकनिष्ठ भक्ताशिवाय मूर्ती राहू शकत नाही. भक्ताच्या मनात देवाला भेटण्याची आत्यंतिक इच्छा जशी उत्पन्न होते व देवाला भेटल्याशिवाय तो राहू शकत नाही, तसेच देवसुद्धा भक्ताला भेटल्याशिवाय राहू शकत नाही. उलट तो एकनिष्ठ भक्ताची वाट पाहतो.
जेव्हा भक्त देवाला संपूर्णपणे वाहून घेतो, तेव्हा देवही भक्ताची काळजी वाहतात. त्याच्या कामात मदत करतात. काम करत असताना देवाचे चिंतन मनातल्या मनात सुरू असेल तर काम कधी संपते हे लक्षातही येत नाही. अशा रितीने देवच अप्रत्यक्षपणे मदत करतो. सतत नामस्मरण करत राहिल्यास अंत:चक्षुसमोर देवाची मूर्ती येऊ शकते. ज्या व्यक्तीच्या प्रयत्नाने मूर्तीमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे, अशी मूर्ती त्या व्यक्तीला सोडून राहत नाही आणि ती व्यक्तीही त्या मूर्तीला सोडून राहू शकत नाही.
ते एकदा नदीत स्नान करीत होते, तेव्हा एका चिकित्सक माणसाने विचारले, `देव जर निर्गुण, निराकार आहे, तर आपण रोज देवाच्या मूर्तीची पूजा का करता? आपण संन्यासी असताना, आपल्याला देवाच्या मूर्तीची आवश्यकता काय?' श्री टेंबे स्वामींनी उत्तर दिले, `नित्य एकाग्र मनाने पूजा केल्यामुळे मी व मूर्ती एकरूप झालो आहोत. मी देवाच्या मूर्तीशिवाय राहू शकत नाही आणि मूर्तीही माझ्याशिवाय राहू शकत नाही. तुम्हाला पहायचे असेल, तर पलीकडे असलेली मूर्ती घेऊन जा!'
टेंबे स्वामींनी मूर्ती त्या माणसाच्या स्वाधीन केली व ते पुढे चालू लागले. तो माणूसही स्वत:च्या मार्गाने चालू लागला. एक-दीड मैल पुढे गेल्यावर त्याने मूर्तीकडे पाहिले, तर मूर्ती अदृष्य झाली होती. तो परत स्वामींकडे आला आणि त्याने ही घटना स्वामींना सांगितली. स्वामींनी त्याला मागे बघायला सांगितले. ती मूर्ती स्वामींच्या मागे येत होती.
हा केवळ चमत्कार नाही, तर ही ईश्वर भक्तीप्रती वाहिलेली आत्मीयता आहे. आपणही रोजच्या देवपूजेत तल्लीन होऊ लागलो, की देवघरातल्या मूर्तींचे बदलते भाव आपल्याला लक्षात येतात. ही सुखद अनुभूती म्हणजेच ईश्वरी चैतन्य!