ज्योत्स्ना गाडगीळ
एका गावात एक खूप मोठा धनिक राहत होता. सात पिढ्यांना पुरून उरेल, एवढी त्याची श्रीमंती होती. मात्र, त्याने कधीच ती मिरवली नाही. याचे कारण, तो महाकंजूस होता. पैसा खर्च केला तर तो संपून जाईल, या भीतीने त्याने स्वत: कधी कोणते सोस केले नाहीत आणि घरच्यांनाही करू दिले नाहीत. त्याने कधी कुणाला दमडीसुद्धा दिली नव्हती. मंदिरातही तो फक्त देवाकडे मागण्यापुरता जात असे. अशा त्याच्या वागण्यामुळे लोक त्याला नावे ठेवत असत.
मात्र एकदा, गावात महारोगाची भयंकर साथ पसरली. हजारो लोक मेले, बायका-मुले अनाथ झाली. गावाला या दु:खाच्या सावटातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदतीची गरज होती. मात्र, गावातील श्रीमंत वर्ग मदतीसाठी पुढाकार घेईना. तेव्हा गावातल्याच एका समाजसेवकाने पुढाकार घेऊन गावासाठी आर्थिक निधी गोळा करायचा असे ठरवले.
हेही वाचा: एखाद्या घावाने तुम्हीही दुखावले आहात का?; खचू नका, कारण...
गावातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखला जाणारा धनिक महाकंजूस आहे, हे सर्वांनाच माहित होते. त्याने मदतीचा हात पुढे केल्याशिवाय बाकीचे मदत करणार नाहीत, याची त्या समाजसेवकाला जाणीव होती. म्हणून त्या धनिकाकडून सर्वप्रथम मदत मिळवायची, असे ठरले. परंतु त्याच्याकडून पैसे मिळवणे सोपे नव्हते. समाजसेवकाने एक क्ऌप्ती केली.
गावातील मंडळी समाजसेवकाच्या नेतृत्त्वाखाली धनिकाच्या घरी आली. हे लोक आपल्याकडे पैसे मागणार, या विचाराने धनिकाच्या कपाळावर आठ्या आल्या. त्याच्या चेहऱ्यावरचे बदलते हावभाव पाहून समाजसेवक म्हणाला, `शेठजी, आम्हाला दहा हजारा रुपयांची मदत हवी आहे. पण, काळजी करू नका, तुम्ही दिलेले पैसे अजिबात खर्च होणार नाहीत. तुम्ही आम्हाला दहा हजार रुपयांचा धनादेश द्या. आज सायंकाळपर्यंत तुम्हाला तो धनादेश जसा च्या तसा परत आणून देतो.'
समाजसेवकाची योजना नक्की काय, हे लक्षात न आल्याने, धनिकाने विचारले, 'धनादेश परत करणार असाल, तर नेऊन काय उपयोग?'
'खूप उपयोग आहे शेठजी. आपल्या गावातले सर्वात श्रीमंत शेठ तुम्ही आहात. तुम्ही या सत्कार्यात १०,००० रुपयांचा धनादेश देऊन सिंहाचा वाटा उचलत आहात म्हटल्यावर, गावातील बाकीचे शेठही आम्हाला यथाशक्ती आर्थिक मदत करतील. त्यांना पुरावा म्हणून हा धनादेश आम्हाला दाखवता येईल. आज सायंकाळपर्यंत सगळे काम पूर्ण झाले, की आम्ही तुमचा धनादेश तुम्हाला सुखरूप परत करू. असे केल्याने तुम्हाला इतरांना सत्कार्यासाठी उद्युक्त केल्याचे पुण्य लाभेल, दानशूर म्हणून गावात प्रसिद्धी मिळेल, शिवाय एक दमडीही खर्च होणार नाही.' - समाजसेवक म्हणाला.
धनिक खुश झाला. काही न करता पैशांची बचत, पुण्यात वाढ आणि प्रसिद्धी मिळत असेल, तर कशाला संधी सोडा? त्याने लगेचच दहा हजार रुपयांचा करकरीत धनादेश गावकऱ्यांच्या हाती सुपूर्द केला.
समाजसेवकासह अन्य गावकरी निघाले आणि पूर्वनियोजित उपक्रमानुसार त्यांनी गावातील अन्य श्रीमंतांकडून, शेठजींचा धनादेश दाखवत वर्गणी गोळा केली. एक कंजूष शेठ अडीअडचणीच्या काळात गावाला एवढी मदत देतो, म्हटल्यावर अन्य गावकऱ्यांनीही सढळ हस्ते मदत केली.
सायंकाळी ठरल्याप्रमाणे समजासेवक धनादेश घेऊन धनिकाच्या भेटीला आला आणि धनादेश परत केला. गावातून गोळा झालेली रक्कम धनिकाच्या कानावर घातली आणि त्याचे आभार मानले. धनिकाला आश्चर्य वाटले आणि लाजही वाटली. गावकऱ्यांनी गावाच्या नुकसान भरपाईसाठी एवढी रक्कम उभी केली. नाहीतर आपण, आयुष्यभर पैसा नुसता कमवला, परंतु चांगल्या कामासाठी कधीच खर्च केला नाही. असे म्हणत धनिक आत गेला. काहीतरी घेऊन बाहेर आला. समाजसेवकाच्या हाती आणखी दहा हजाराचा धनादेश देत म्हणाला,
'आजतागायत मी कधीच कोणाला दान, मदत केली नाही. मात्र, आज नुसता धनादेश दिला, हे कळल्यावर सकाळपासून लोकांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा मिळत आहेत. मी न केलेल्या दानाबद्दल गावकऱ्यांनी माझे आभार मानले. ते ऐकताना जो आनंद मिळाला, तो मला शब्दात सांगता येणार नाही. म्हणून मला हा धनादेश तर परत नकोच, उलट आणखी दहा हजाराचा धनादेश देतो, तो घेऊन जा आणि दातृत्त्वाचा खराखुरा आनंद मला उपभोगू द्या.'
ज्ञान, पैसा आणि आनंद दिल्याने दुप्पट होतो. तो आपल्यापुरता ठेवू नका, योग्य ठिकाणी वाटत चला, तुम्हाला कधीच कसलीच कमतरता जाणवणार नाही.