'श' म्हणजे शांती आणि `नि' म्हणजे निश्चय देणारी देवता म्हणजे शनी! ज्या शनिमहाराजांना आपण बघायलाही घाबरतो, त्यांना खगोलशास्त्राने सर्वात मनोहारी ग्रह असल्याचे म्हटले आहे. ह्या ग्रहाभोवती असलेली कडी अतिशय नेत्रदीपक आहे, असे म्हणतात. म्हणजेच काय, तर त्यांच्याकडे बघण्याची आपली दृष्टी बदलणे गरजेचे आहे.
सूर्यदेवाचे पुत्र, यमदेवाचे ज्येष्ठ बंधू आणि वायुपुत्र हनुमंताचे जिवलग मित्र असलेले शनिदेव, त्यांचे वर्णन करताना महर्षी वेदव्यासांनी नवग्रह स्तोत्रात म्हटले आहे-
नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजमछायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम।।
अर्थ - निळ्यारंगाची प्रभा असलेल्या, सूर्यपुत्र, यमाचा मोठा भाऊ असलेल्या, छाया व सूर्य यांच्या पोटी जन्मलेल्या त्या शनैश्चराला (शनीला) मी नमस्कार करतो.
'शनी' हा ग्रह नवग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हटले जाते. मात्र, त्यांच्याबद्दलचा लोकांचा `ग्रह' आजतागायत शुद्ध झालेला नाही, उलटपक्षी ते आपल्या राशीला येऊ नयेत म्हणून सगळे `आग्रही' असतात. एखाद्याला रावाचा रंक, तर एखाद्याला रंकाचा राव बनवण्याची किमया त्यांच्याकडे आहे. ते कठोर शासनकर्ते आहेत. म्हणून, जे लोक दुष्कृत्य करतात, ते त्यांना बाचकून असतात. मात्र ज्या व्यक्तीचे आचरण शुद्ध असते, अशा व्यक्तींनी शनी महाराजांची भीती बाळगण्याचे अजिबात कारण नाही. मनुष्याला शिस्त लागावी म्हणून साडेसातीच्या काळात ते कठोरपणे वागतात, पण ती व्यक्ती सुधारली तर तिचा उद्धारही करतात. त्यासाठी शनी उपासना करताना पुढीलपैकी कोणताही एक मंत्र १०८ वेळा जप करा आणि शनिकृपा प्राप्त करा.
ॐ शं शनैश्चराय नमः।ॐ रां राहवे नमः! ॐ कें केतवे नमः। ॐ काळ भैरवाय नमः।
।। अंजनीगर्भसंभूतो वायुपुत्रो महाबलः।कुमारो ब्रह्मचारी च तस्मै हनुमते नमः।।
श्रीराम जय राम जय जय राम।