२२ जानेवारी जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशी एकीकडे राम भक्तांची उत्सवाची लगबग सुरू झाली आहे तर दुसरीकडे टीकाकारांची टीकेची झोड. श्रीरामाच्या चारित्र्यापासून मंदिर व्यवस्थापन, पूजा, आमंत्रित लोक अशा कोणत्याही विषयावर शेरेबाजी होऊ लागली आहे. मात्र अयोध्येत होणाऱ्या उत्सवावर त्याचा किंचितही फरक पडताना दिसत नाही. उलटपक्षी प्रत्येक जण आपापल्या तऱ्हेने रामसेवा कशी देता येईल यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. लेखन, नृत्य, वक्तृत्त्व, कथाकथन, रांगोळी, शिल्प, चित्र अशा अनेक तऱ्हेच्या अभिव्यक्तीतून लोक आपला आनंद व्यक्त करत आहेत. अशातच टीकाकारांना उत्तर देताना ज्येष्ठ आध्यात्मिक व्याख्याते सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी खरमरीत शब्दात कानउघडणी केली आहे.
अलीकडेच एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, 'रामलला हे हिंदूंचे आराध्य दैवत आहे. तेहेतीस कोटी देव आपण मानतो, पैकी राम, कृष्ण आणि शंकर यांची देवस्थाने हिंदूंच्या हृदयाच्या अतिशय जवळची आहेत. ५०० वर्षांच्या लढ्यानंतर रामललाला त्याचे जन्मस्थळ असलेले मंदिर मिळत असेल तर हा आनंदाचा क्षण आपणही आनंद मानून साजरा करायला हवा. त्यात टीका करण्याचे काहीच कारण नाही. किंवा कोणत्याही शंका उपस्थित करण्याचीही गरज नाही. राम सर्वांचा आदर्श असल्याने आपणही एकजुटीने या सोहळ्याचे मनापासून स्वागत केले पाहिजे. तो केवळ देव म्हणून नाही तर मर्यादापुरुषोत्तम म्हणूनही अनुकरणीय आहे. त्यामुळे, नास्तिक असाल तर दुसऱ्यांच्या आनंदावर विरजण न टाकता दोन पावलं मागे घेऊन त्यांना त्यांचा आनंद साजरा करू दिला पाहिजे.
मंदिर हे केवळ भगवंताचे वसतिस्थान नाही तर ते लाखो लोकांसाठी ऊर्जा केंद्र आहे. रामललाचे मंदिर हा केवळ तात्कालिक सोहळा नाही तर पुढच्या शंभरेक वर्षात येणाऱ्या पिढ्यांसाठी रामाचा इतिहास सांगणारी वास्तू आहे. ते त्याचे जन्मस्थळ आहे. तिथे मंदिर नव्याने उभे राहत आहे तर त्यात वावगं वाटण्याचे कारणच नाही. हे मंदिर कोणाच्याही हक्कांवर गदा न आणता रीतसर कायद्याची लढाई जिंकून उभारले जात आहे. त्यामुळे धार्मिक, आर्थिक, ऐतिहासिक, कायदेशीर रित्या ते अधिकृत स्थान आहे.
म्हणून, २२ जानेवारीच्या सोहळ्यात ज्यांना आनंद व्यक्त करावासा वाटत नाही त्यांनी शांत राहून या उत्सवाचे पावित्र्य राखा आणि ज्यांना हा सोहळा आनंदाने साजरा करावासा वाटतो, त्यांच्या मार्गातला अडसर बनू नका, हे समंजसपणे करणे हीच खरी लोकशाही!