- डॉ. शारदा पालकर-निवाते
बलिप्रतिपदेच्या शुभदिनी २१ ऑक्टोबर इ. स. १९२२ रोजी मुंबईच्या गिरगावातील आंग्रेवाडीतील एका सर्वसामान्य एकत्र कुटुंबात, गजाननराव व राधाबाई यांच्या पोटी वामनरावांचा जन्म झाला. मॅट्रिकची परीक्षा उत्तम गुणांनी पास झाल्यानंतर वामनरावांनी माटुंग्याच्या रुईया कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला. १९४४ साली ते बी. ए. (ऑनर्स) उत्तीर्ण झाले. १९४५ साली वयाच्या २३व्या वर्षी मुंबईतील सचिवालयात म्हणजे आताच्या मंत्रालयात वामनराव सरकारी नोकरीत लागले.
१८ मे १९४८ या दिवशी श्री वामनराव पै यांचा विवाह गोव्यात स्थायिक विश्वनाथ नेवरेकर यांची कन्या नलिनी यांच्याशी झाला. विवाहानंतर नलिनी झाल्या शारदामाई ! १९४८ या वर्षातच त्यांनी श्री नानामहाराज श्रीगोंदेकर यांचा अनुग्रह घेतला. प्रपंचासोबत त्यांची आध्यात्मिक साधनाही सुरू झाली. त्यांना नामस्मरणाचा छंद लागला. खरे तर ईश्वरभक्तिचा हा वारसा त्यांच्या आई राधाबाई यांच्याकडून त्यांना मिळाला होता. प्रपंच करून परमार्थ सिद्ध करता येतो, अशी शिकवण देणारे सदगुरू श्री नानामहाराज यांचे मार्गदर्शन वामनरावांना मिळाले.
सन १९५२पासून मुंबईत सद्गुरू श्री वामनराव पै यांचे नियमित समाजप्रबोधनाचे कार्य सुरू झाले. सुरुवातीला दादरमधील विवेकानंद स्पिरीच्युअल सेंटर येथे त्यांचे ज्येष्ठ गुरुबंधू परमपूज्य दादासाहेब सबनीस यांची प्रवचने ऐकायला ते जात. त्यानंतर त्यांच्यासोबत वामनरावांचीही तेथे प्रवचने सुरू झाली. सदगुरू श्री वामनराव पै यांची प्रवचने - कीर्तने कामगारांच्या आग्रहास्तव चिंचपोकळी, काळाचौकी, लालबाग कामगार विभागात सुरू झाली. सचिवालयातील नोकरी सांभाळून सायंकाळी ते प्रवचने करीत. कार्यालयातून संध्याकाळी घरी आल्यानंतर क्षणभर विश्रांती घेऊन झाल्यावर लगेचच ते प्रवचनाच्या ठिकाणी जायला निघत. तेथे ते ट्रेन किंवा बसने स्वखर्चाने जायचे.
प्रवचनाला येणाऱ्या साधकांच्या आग्रहाखातर त्यांनी ग्रंथलेखनास आरंभ केला. सध्या जीवनविद्या मिशन अमृतबोलच्या माध्यमातून सदगुरूंची रेकॉर्डेड प्रवचने - कीर्तने प्रसारीत होत असतात. तसेच प्रल्हाददादांचे ऑनलाईन मार्गदर्शन प्रसारीत होत असते. हजारो लोक त्या मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत. २९ मे २०१२ रोजी सदगुरू श्री वामनराव पै देहरूपाने पंचत्त्वात विलीन झाले. पण आजही जीवनविद्येच्या तत्त्वज्ञानावर आधारीत त्यांचे ग्रंथ, त्यांची डिजिटल स्वरूपात उपलब्ध असलेली कीर्तने, प्रवचने, जीवनविद्या फाऊंडेशन, जीवनविद्या ज्ञानपीठाच्या माध्यमातून अव्याहतपणे सुरू असलेले वैविध्यपूर्ण कार्यक्रम या सर्वांच्या रूपाने ते अजरामर आहेत.त्यांच्या तत्त्वज्ञानाचा वारसा त्यांचे सुपुत्र श्री प्रल्हाद पै अत्यंत विनम्रपणे पुढे नेत आहेत.
समाजोपयोगी असे अनेक अभियान ते राबवित आहेत. ग्रामसमृद्धी अभियान, स्वच्छता अभियान, संस्कार शिक्षण अभियान, विद्यार्थी मार्गदर्शन, अवयव दान, व्यसनमुक्ती, स्त्रीसन्मान इत्यादी अभियानांच्या माध्यमातून अनेक अभ्यासू मंडळी एकत्र येऊन दादांच्या मार्गदर्शन व नेतृत्त्वाखाली समाजबांधणीचे कार्य करीत आहेत. परदेशात स्थायिक भारतीय व परदेशातील जीवनविद्येच्या इतर अभ्यासकांसाठी वेबिनार्सद्वारे प्रल्हाददादा सातत्याने मार्गदर्शन करीत असतात. सदगुरूंच्या जन्म शताब्दीच्या निमित्ताने ठिकठिकाणी अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रम संपन्न होत आहेत. सुविचारसंपन्न नवसमाजाची ही नांदीच आहे.