२३ ऑगस्ट २०२३ रोजी इसरोच्या चांद्रयान तीनचे सॉफ्ट लँडिंग झाल्यावर आनंदून गेलेल्या भारतीयांचे डोळे लागले होते ते आणखी विश्वविक्रमाकडे! तो विश्वविक्रम अर्थात २४ ऑगस्ट रोजी बुद्धिबळपटू प्रज्ञाननंदा याची आंतराराष्ट्रीय स्पर्धेतली लढाई! कारण ही स्पर्धा जिंकली असता आंतरराष्ट्रीय पातळीवर बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरणार होता. मात्र निराशा पदरात आली. अटीतटीचा मुकाबला सुरू झाला. सर्वांच्या अपेक्षा वाढल्या होत्या, मात्र एका बेसावध क्षणी प्रतिस्पर्धी मॅग्नस कार्लसन याच्याकडून त्याला हार पत्करावी लागली.
थोडक्यासाठी हुकलेली संधी, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी केलेला सराव, कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षा आणि विश्वविक्रमापासून काही क्षणांची दुरी असताना थांबावे लागणे यासाठी किती मनोधैर्य लागत असेल याचा नुसता विचारच केलेला बरा! पण असे कसलेले खेळाडू जशी यशाची तयारी करतात, तशी अपयशाला सामोरे जाण्याचीही तयारी ठेवतात. प्रज्ञाननंदा यानेही ती केली होती; नव्हे तर तशी करून घेतली होती, सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी!
एका कार्यक्रमाप्रसंगी सद्गुरू जग्गी वासुदेव विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रज्ञाननंदा याने त्याना प्रश्न विचारला, 'तणाव नियंत्रण कसे करावे?' यावेळेस सद्गुरूंनी केलेला उपदेश हा आपणा सर्वांना उपयोगी पडण्यासारखा आहे. कसा ते जाणून घेऊ.
सद्गुरू म्हणाले, 'ज्याला तुम्ही टेन्शन, नैराश्य, स्ट्रेस, वेडेपणा म्हणता ते तुम्हीच तुमच्या विचारांचं वाहिलेलं अतिरिक्त ओझं असतं. टेन्शन येतं कारण तुम्ही अपेक्षांखाली दबलेले असता, बुद्धिबळाचा खेळ खेळताना कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षा, बक्षीस मिळेल की नाही याची काळजी, प्रतिस्पर्ध्याला हरवण्याची जबाबदारी या सगळ्या विचारांनी उर दडपला जातो. तसे होऊ देऊ नका. खेळाकडे खेळ म्हणून बघायला शिका. बाकी विचार सोडून द्या. दुसरा आपल्यापेक्षा सरस असू शकतो हे मान्य करा, मात्र स्वतःला समोरच्यापेक्षा किंवा स्वतःपेक्षा स्वतःलाच कमी लेखत असाल तर पाप करत आहात हे लक्षात ठेवा.
एकावेळी एकाच कामावर लक्ष द्या, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं ओझं मनावर बाळगू नका. अन्यथा इतर विचार करण्याच्या नादात तुम्ही छोटीशी चूक करून बसाल आणि तुमचा प्रतिस्पर्धी त्याच क्षणाची वाट बघत तुम्हाला नामोहरम करेल. ज्याप्रमाणे आत्मविश्वासाचा अभाव वाईट तसा अति आत्मविश्वासही वाईटच! लोक तुम्हाला जगतजेता म्हणू द्या, पण तुम्ही स्वतःला जगतजेता समजू नका, एकदा का त्या विचारात शिरलात तर आपोआप अपेक्षांचं ओझं मनावर येईल किंवा अति आत्मविश्वासाच्या भरात चूक घडेल. म्हणून वर्तमानात जगा. खेळाकडे तटस्थपणे बघा. यशाचे जसे स्वागत करता तसे अपयशाचेही स्वागत करा. तरच तणाव तुमच्या आसपासही फिरकणार नाही आणि आयुष्याचा आनंद घेऊ शकाल.
सद्गुरूंनी हे जरी खेळाच्या बाबतीत सांगितले असले तरी हा कानमंत्र आपल्या सगळ्यांच्याच उपयोगी आहे. तो म्हणजे अति ताण न घेता आहे त्या परिस्थितीला सामोरे जावे आणि यश अपयशासह आयुष्याचा खेळ खेळावा!