काल संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी झाली, आज अर्थात २७ जुलै रोजी संत सावता माळी यांची पुण्यतिथी आहे. शेतात मळा फुलवता फुलवता विठ्ठल पायी गोविला गळा, ही किमया त्यांनी साध्य केली. या संतांनी सामान्य कुटुंबात जन्म घेऊन आपल्या भक्तीने असामान्य पद गाठले आणि ते ईश तत्त्वाशी एकरूप झाले.
संत, महंत, पुण्यात्मे, देशभक्त, समाजसेवक यांची जयंती, पुण्यतिथी का साजरी करायची? तर त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याची उजळणी करता यावी म्हणून! त्यांच्या आयुष्यात सर्वकाही आलबेल होते असे नाही, तर प्रतिकूलतेवर मात करून त्यांनी आपले ध्येय कसे गाठले याचा आदर्श त्यांच्या चरित्रातून मिळतो. आपल्याला जगण्याचे उद्दिष्ट मिळते. परिस्थितीशी सामना करण्याचे धैर्य मिळते. काय चांगले, काय वाईट याचा सारासार विचार करून ध्येय निश्चिती करता येते, म्हणून त्यांचे वेळोवेळी स्मरण!
संत सावता माळी हे संत पदाला पोहोचले ते आपल्या कृतीतून. अध्यात्म जोडायचे म्हणजे नुसते देव देव करत बसायचे असे नाही, तर आपल्या कामात आपला देव शोधायचा. जसा सावता माळी, गोरा कुंभार, सेना न्हावी इ. संतांनी शोधला. जनाबाई तर दळिता कांडिता देवाचे नाव घेई. मात्र हे नाव निःस्वार्थ बुद्धीने घेतले जात असे. म्हणून या संतांना परमेश्वर प्राप्त झाला. आपणही मनात काही मिळावं हा हेतू न बाळगता मुखी नाम आणि प्रामाणिकपणे काम केले तर आपल्यालाही ईशकृपा मिळू शकते अशी ग्वाही आपल्याला संत देतात.
संत सावता माळी पुढील अभंगात सोदाहरण ते पटवून देतात -
कांदा-मुळा-भाजी ।अवघीं विठाई माझी ॥१॥
लसुण-मिरची-कोथिंबिरी ।अवघा झाला माझा हरीं ॥२॥
ऊस-गाजर-रातळू ।अवघा झालासें गोपाळू ॥३॥
मोट-नाडा-विहींर-दोरीअवघीं व्यापिली पंढरी
सावता म्हणें केला मळा ।विठ्ठल पायीं गोविंला गळा ॥५॥
समजायला अतिशय सोपा अभंग आहे, पण अंगवळणी पडायला कठीण! परंतु प्रयत्न केला तर तेही अशक्य नाही. संत सावता माळी यांना स्मरून आपणही आजपासून आपल्या कामागणिक, श्वासागणिक देवाचे नाम घेऊया आणि देवरूप होऊया!