संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा अभंग सर्वपरिचित आहे. पण तो लिहिण्याची गरज महाराजांना का भासली असावी? कारण, महाराजांनी तत्कालीन परिस्थितीत समाजाचे अवलोकन केले, समाज मनाचा अभ्यास केला आणि भोळ्या भाबड्या जनतेला वेठीस धरणारे ठग पाहिले आणि समाजहितासाठी त्यांनी प्रबोधनपर या अभंगाची निर्मिती केली. यात ते म्हणतात,
बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाउले ॥अंगे झाडीन अंगण । त्याचे दासत्व करीन ॥त्याचा होईन किंकर । उभा ठाकेन जोडोनि कर ॥तुका म्हणे देव । त्याचे चरणी माझा भाव ॥
"जो 'जसा बोलतो त्याप्रमाणेच वागतो' त्याच्या पाउलांचे मी वंदन करतो. अशा उक्ती आणि कृतीत साधर्म्य असणाऱ्या लोकांच्या घराचे अंगण मी स्वतःच्या अंगाने झाडीन, त्याचा दास बनून राहीन. त्यांच्या सेवेत तप्तर राहीन. माझ्यासाठी तेच देव असतील आणि त्यांच्या चरणी माझा प्रेमभाव असेल, असा या अभंगाचा साधा सोपा अर्थ आहे.
अशा शब्दाला जगणाऱ्या लोकांची समाजाला गरज आहे. अशा लोकांसमोर समाज नतमस्तक होतो. त्यामुळे महाराज सांगतात बोलण्याआधी विचार करा, बोलून झाल्यावर नाही आणि विचाराअंती जे बोलल त्या विषयावर ठाम राहा, मात्र बोलून झाल्यावर आपल्या शब्दांपासून तुम्ही मागे फिरणार असाल तर न बोलणे इष्ट!