मृत्युनंतर जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका व्हावी असे आपल्या सर्वांनाच वाटते. यालाच आपण मोक्ष किंवा मुक्ती मिळणे असे म्हणतो. दोन्ही शब्दांचे अर्थ सारखे वाटत असले, तरी त्यात मोठा फरक आहे. तो फरक कोणता, हे समजून घेऊया.
मुक्ती : व्यक्तीच्या मृत्यूपश्चात श्राद्धविधी केले जातात. या विधींमुळे आत्म्याला सद्गती मिळते अशी श्रद्धा आहे. श्रद्धेने केले जाते, म्हणून त्याला श्राद्ध म्हणतात. चौऱ्यांशी लक्ष योनींचा प्रवास पूर्ण करून आत्मा नरदेहात प्रवेश करतो. या चक्रात तो पुन्हा अडकू नये, म्हणून मृत्यूपश्चात तर्पण करून आत्म्याला सद्गती मिळावी अशी देवाकडे प्रार्थना केली जाते. यालाच आत्म्याला मुक्ती मिळणे असे म्हणतात.
मोक्ष : मोक्ष ही संकल्पना ऋषिमुनींकडून आपण ऐकत आलो आहोत. मोक्ष मिळण्यासाठी आयुष्यभर तपश्चर्या करावी लागते. तेव्हाकुठे मृत्यूपश्चात जीव शिवाशी एकरूप होतो. ही भक्त भगवंताची एकरूपता म्हणजे मोक्ष! तो मिळणे अतिशय कठीण आहे. म्हणून आपण सामान्य लोक मुक्तीची अपेक्षा करू शकतो. मोक्षाची नाही! मोक्ष कोणाला मिळतो? ज्याने आयुष्यभर नि:स्वार्थपणे देवकार्य, देशकार्य, समाजकार्य केले. असे लोक आपल्या कृतीतून आपले आयुष्य सार्थकी लावतात. त्यांनाच मोक्षप्राप्ती होते.
जर आपणही सत्कार्य केले, स्वत:बरोबर देव, देश, धर्माच्या उत्कर्षाचा विचार केला, कृती केली, तर आपल्याही मोक्ष नक्की मिळू शकेल. अन्यथा आपल्या नावाने कोणी ना कोणी मुक्तीची प्रार्थना करणारे असेलच...! मग आता मोक्ष मिळवायचा की मुक्ती, हे तुम्हीच ठरवा!