हिंदू पंचागानुसार चैत्र, वैशाखादी मासगणनेतील `मार्गशीर्ष' हा नववा महिना. ह्याच्या पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर मृगशीर्ष हे नक्षत्र असते, म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष असे नाव प्राप्त झाले. गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूतीयोग सांगताना भगवंतांनी 'मासानां मार्गशीर्षोऽहम' म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो, असे म्हटले आहे.
बहुत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकर:।
अशा श्रीकृष्णासाठी यशोदेने संकष्टीचे व्रत केले होते. त्याची कथा जाणून घेऊ. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात आलेल्या संकष्टीचे महत्त्व अधोरेखित होईल!
लहान हूड मुलाचा खोडकरपणा त्याच्या आईला सर्वात अधिक त्रासदायक आणि आनंददायकही वाटतो. बालकृष्ण म्हणजे लहानपणाचे भगवान श्रीकृष्ण हे मुलखाचे खोडकर मूल. त्याने आपल्या लहानपणी माय यशोदेला कसे `त्राहि भगवान' केले असेल, याची कल्पनाच केलेली बरी. या प्रसंगाचे यथार्थ वर्णन ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी केले आहे.
कृष्णाच्या खोड्यांनी यशोदा कमालीची हैराण झाली होती. तेव्हा गौळणींपैकी कोणीतरी म्हणाली, 'बाई गं, संकष्टी चतुर्थीचे व्रत एकदा करून पाहा.' गौळणीचा सल्ला मानून यशोदेने संकष्टीव्रताचे आचरण सुरु केले. संत नामदेव ह्या घटनेचे रसाळ वर्णन शब्दबद्ध करतात,
गोपिका म्हणती, यशोदा सुंदरी। करीतो मुरारी, खोडी बहु।यशोदेप्रती त्या, गौळणी बोलती, संष्टी चतुर्थी, व्रत घेई।गणेश देईल, यासी उत्तम गुण, वचन प्रमाण, मानावे हे।गजवदनासी तेव्हा, म्हणत यशोदा, माझिया मुकुंदा गुण देई।
यशोदेचा हा संकल्प ऐकल्यानंतर बालकृष्णाने एक महिनाभर खोडी केली नाही. गणपती आपल्याला पावला, या भावनेने यशोदा निष्ठेने उपास करू लागली. धन्य धन्य देव गणपती पाहे, यशोदा ती राहे उपवासी!
संकष्टीच्या रात्री चंद्रोदय झाल्यानंतर यशोदेने एकवीस लाडू केले आणि त्याबरोबर बरेच मोदक तयार करून देवासमोर नैवेद्य ठेवला.
शर्करामिश्रित लाडू येकवीस, आणीक बहुवस, मोदक तो।ऐसा नैवेद्याचा, हारा तो भरूनी, देव्हारी नेऊनि, ठेवी माता।मातेसी म्हणत, तेव्हा हृषिकेशी, लाडू केव्हा देसी, मजलागी।यशोदा म्हणते, पूजीन गजवदना, नैवेद्य दाऊन, देईन तुज।
पण बाळकृष्णाला एवढा धीर कुठे? आई बाहेर जाताच, बाळकृष्णाने नैवेद्य फक्त केला आणि तृप्तीचा ढेकर दिला. यशोदा आली आणि पाहते तर नैवेद्याचे ताट रिकामे. तिने कृष्णाला विचारले, तर कृष्ण सांगतो, `मैय्या, हजार उंदिर आले आणि लाडू, मोदक खाऊन गेले. त्यातल्या एका उंदरावर बसून विनायक देखील आले होते. त्या सगळ्यांनी मिळून नैवेद्य संपवला. आता मी काय खाऊ? मला काहीतरी खायला दे!
कृष्णाची खोडी ओळखून यशोदा माता म्हणाली, `कृष्णा तोंड उघड पाहू.' कृष्णाने तोंड उघडले, तर काय आश्चर्य...
कृष्णनाथे तेव्हा, मुख पसरिले, ब्रह्मांड देखिली मुखामाजी।असंख्य गणपती, दिसती वदनी, पहातसे नयनी, यशोदा ते।
कृष्णाच्या मुखात ब्रह्मांड दिसले आणि त्याच्या मुखातून स्वत: गणपतीच बोलू लागले, `यशोदे, तू तुझ्या कृष्णाचे लाड पुरव. तो नैवेद्य मला आपोआप मिळेल.'
यशोदेचा राग निवळला आणि तिने कृष्णाचे मुके घेतले. नंतर कृष्णासाठी आणि बाप्पासाठी पुन्हा लाडू मोदक केले. तेव्हापासून आजतागायत घरोघरी होत असलेल्या, ना कृष्णलीला कमी झाल्या, ना यशोदेच्या तक्रारी. या गोड नात्याचा साक्षीदार विनायक मात्र गाली हसून तथास्तू म्हणतो आहे.