१२ नोव्हेंबर रोजी शनिवारी संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi 2022) असून रात्री ९ वाजून २ मिनिटांनी चंद्रोदय आहे. बाप्पा आपल्याला प्रिय, म्हणून दर महिन्यात आपण हा उपास करतो, पण केवळ उपास नाही, तर उपासनाही का व कशी महत्त्वाची त्याबद्दल माहिती घेऊ.
प्रत्येक मासाच्या कृष्ण चतुर्थीला `संकष्ट चतुर्थी' हे व्रत साजरे केले जाते. हे व्रत फार प्राचीन आहे. भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे सर्वश्रुत आहे. त्यांनी आपला खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चारचौघा मुलांसारखे वागावे म्हणून यशोदामातेने हे व्रत केल्याचा उल्लेख आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते.
या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचे दर्शन झाल्यावर त्याला नमस्कार करून ताम्हनात अर्घ्य द्यावे. नंतर गणपतीला नैवेद्य दाखवून आरती करून उपास सोडावा. उपास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. हे एक काम्यव्रत आहे. काही व्रते केवळ सेवा म्हणून निष्काम मनाने केली जातात, तर काही ईच्छापूर्तीसाठी केली जातात. संकष्ट चतुर्थीचे व्रत ईच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते. मनोभावे हे व्रत केले असता, गणरायाची कृपादृष्टी लाभून ईच्छापूर्ती होते, असा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे.
हे व्रत करताना आपल्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार करणे जरूरी आहे. कित्येक लोक संकष्टीचा उपास सकाळी फक्त चहा घेऊन किंवा निर्जळी उपास करतात. परंतु, तसा उपास सर्वांच्या प्रकृतीला सहन होतो असे नाही. अशा वेळी उपासाचे वातुळ पदार्थ खाऊन उपास करण्यापेक्षा उपास न करणे प्रकृतीच्या दृष्टीने योग्य ठरते. याउलट फलाहार करून उपास केला आणि रात्री पूर्णान्न भोजन ग्रहण केले, तर दिवसभर केलेल्या तपश्चर्येचा तना-मनाला निर्मळ आनंद मिळतो आणि झोपही छान लागते.
या दिवशी उपासाइतकेच उपासनेलाही महत्त्व असते. देवाची करुणा भाकावी, त्याच्या सान्निध्यात राहावे, पूजा करावी, अभिषेक करावा. यामुळे पूजेत मन एकाग्र होते. बाह्य विश्वाचा विसर पडतो. मुखी नाम यावे, याकरीता `ओम गं गणपतये नम:' या मंत्राचा जप करावा. अथर्वशीर्ष पाठ असल्यास त्याची ११ विंâवा २१ आवर्तने करावी. अगदीच शक्य नसल्यास एकदातरी भक्तीभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे. आपली ईच्छा देवासमोर प्रगट करावी आणि ईच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. ईच्छेमागील हेतू शुद्ध असेल आणि आपले कर्म चांगले असेल, तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही!