गणपती ही इच्छापूर्ती करणारी देवता! म्हणूनच आपण तिला सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणतो. बाप्पाचा आशीर्वाद मिळावा म्हणून संकष्टीला उपास व उपासना देखील करतो. याच उपासनेचा एक भाग म्हणून इच्छापूर्तीसाठी ज्योतिष शास्त्राने एक सोपा उपाय सांगितला आहे. संकष्टीच्या तिथीला हा उपाय जरूर करावा, त्यामुळे कार्यसिद्धी अर्थात इच्छापूर्ती होते असे ज्योतिष अभ्यासक सांगतात. तो उपाय कोणता ते पाहू.
संकष्टीच्या दिवशी उपास आपण करतोच, त्यात उपासनेची भर म्हणून सायंकाळी चंद्रोदयापूर्वी पुढील उपाय करावा. संकष्टीच्या तिथीला चंद्र दर्शन घेऊन मगच उपास सोडण्याची प्रथा आहे. त्यानुसार चंद्रदर्शनाचा आधीचा काळ अर्थात सायंकाळची वेळ जेव्हा आपण कामावरून घरी येतो, तेव्हा हा विधी करावा.
>> बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने अंघोळ करावी. त्यामुळे दिवसभराचा शीण जातो आणि मन ताजेतवाने होऊन पूजेसाठी सज्ज होते.
>> त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे. देवपूजा करावी.
>> बाप्पाची मूर्ती ताम्हनात घेऊन पाणी किंवा दूध पळी पळी घेत गणरायाला अथर्वशीर्ष म्हणत अभिषेक घालावा.
>> त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून, पुसून देवघरात ठेवावी. गंधाक्षता लावाव्यात. जास्वंदीचे फुल वाहावे. दुर्वांची जुडी अर्पण करावी.
>> गूळ खोबरे किंवा मोदकाचा तसेच उपास सोडताना जे अन्न ग्रहण करणार आहोत त्या ताटाचा नैवेद्य दाखवावा.
>> मनोभावे देवाची पूजा करावी. मनोमन आपले प्रश्न, समस्या, अडचणी देवाला सांगाव्यात आणि इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करावी.
>> त्यासाठी 'मंगलमूर्ती विघ्नहरा, विघ्ननाशका कृपा करा' हा मंत्र शांतपणे १०८ वेळा म्हणावा.
>> मोठी अडचण असेल किंवा मन शांत नसेल तर हा साधा सोपा उपाय मनोकामना पूर्ती होईपर्यंत रोज करावा.
>> गणपती ही इच्छापूर्ती करणारी देवता असल्याने या उपायाची प्रचिती येते, अर्थात उपासनेत आपलेही समर्पण तेवढेच महत्त्वाचे असते.
बाप्पा मोरया!