गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात. त्यानुसार नुसत्या उपसासाठी गृहिणींनी पाकसिद्धी करून उपासाच्या पदार्थांचे शेकडो प्रकार शोधून काढले. तरीसुद्धा उपासाला निवडून येते साबुदाण्याची खिचडी नाहीतर वरी भात आणि दाण्याची आमटी! मात्र तेच तेच प्रकार करून कंटाळला असाल आणि जिभेचे चोचले पुरवण्याच्या शोधात असाल तर उपासाच्या भज्यांची रेसेपी खास तुमच्यासाठी! आज संकष्टी आहे आणि बाहेर मस्त रिमझिम पाऊस! त्यानिमित्त हा प्रयोग करून बघा!जेणेकरून चविष्ट रेसिपीने मन तृप्त होईल आणि उपास व उपासनाही आनंदात पार पडेल. चला तर शिकून घेऊया उपासाच्या भजीची सोपी, झटपट आणि चविष्ट रेसेपी!
साबुदाणा भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
बटाटे, हिरव्या मिरच्या, सैंधव मीठ किंवा साधं मीठ, काळी मिरी पूड, पाणी, तेल
साबुदाण्याची भजी बनवण्याची कृती :
- सर्वप्रथन साबुदाणा स्वच्छ कापडाने पुसून घ्या. जेणेकरून त्यावरील सर्व पावडर निघून जाईल.
- त्यानंतर एका कढईमधे एक वाटी साबुदाणा घालून तो मंद आचेवर ४-५मिनिटे भाजून घ्या.
- साबुदाणा कढईतून काढून घ्या आणि थंड होऊ द्या. थंड झालेला साबुदाणा मिक्सरमध्ये जाडसर राहील अशा बेताने फिरवा.
- यानंतर साबुदाण्याची पावडर बाजूला ठेवा.
- मिक्सरच्या भांड्यात २ कच्चे बटाटे कापून त्याच्या फोडी टाका. त्यात एक वाटी पाणी २ ते ३ हिरव्या मिरच्या घालून फिरवा.
- या मिश्रणात साबुदाण्याची पावडर घालून पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करा.
- आता हे एकजीव झालेले मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. आणि १० मिनिटे एकजीव होण्यासाठी ठेवून द्या.
- १० मिनिटानंतर हे मिश्रण थोडे घट्ट होईल. मग त्यात अजून थोडेसे पाणी घालून मऊसूत भज्यांसाठीचे मिश्रण तयार करा.
- नंतर त्यात तुमच्या घरी जे जिन्नस उपवासाला खाल्ले जात असतील त्यानुसार घाला. जसे की, कोथिंबीर, काळी मिरीपूड, सैंधव मीठ, कोथिंबीर घाला आणि एकत्र करा.
- तुम्ही यामध्ये शेंगदाणे भरड देखील घालू शकता.
- त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून भजी टाकून तळून घ्या.
- मध्यम आचेवर भाजी खमंग तळून घ्या आणि खोबऱ्याच्या किंवा खजुराच्या चटणी बरोबर गरमागरम सर्व्ह करा.
- याच मिश्रणापासून तुम्ही आप्पेदेखील तयार करू शकता.