संकष्ट चतुर्थीचा उपास सोडताना आपण बाप्पाची आरती म्हणतो आणि घालीन लोटांगण या अभंगाने आरतीचा शेवट करतो. हो अभंगच! त्याजोडीलाच ओघाओघात जे कवन म्हणतो, ते कसे जोडले गेले आणि कोणी लिहिले याचा तपशील जाणून घेऊ.
'सुखकर्ता दुःखहर्ता' ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिली हे तर आपण जाणतोच. मात्र शेवटी जो आरतीला जोडून अभंग म्हटला जातो, तो संत नामदेवांचा आहे.
घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहीन रूप तुझेप्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणे नामा!
हा अभंग हा वैष्णव संत नामदेव ह्यांनी भगवान श्री कृष्णाला, पांडुरंगाला उद्देशून म्हटला आहे. यात अनेकदा लोक स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात करतात. मात्र, संत नामदेव लोटांगण घालण्याबाबत देवाला वचन देत आहेत आणि आपण मात्र स्वतः भोवती गिरकी घेऊन शॉर्टकट मारतो. तसे न करता, पूर्ण आरती होईपर्यंत डोळे मिटून शांतपणे उभे राहावे, सगळे श्लोक म्हणून झाले की मग लोटांगण अर्थात पुरुषांनी साष्टांग दंडवत आणि स्त्रियांनी गुडघे जमिनीला टेकवून अर्धनमस्कार करावा, असे शास्त्र सांगते.
त्यानंतर जोडून येतो तो भाग संस्कृतातील आहे. बालपणापासून कानावर पडून हे श्लोक आपल्याला तोंडपाठ झाले. पण ते कुठून आले आणि त्याचा अर्थ काय ते पाहू.
त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेवत्वमेव विद्या द्रविणंम त्वमेव, त्वमेव सर्व मम् देव देव - गर्ग संहिता (द्वारका खंड)
गर्ग मुनी यांनी भगवान श्री कृष्णाला उद्देशून वरील श्लोक रचला आहे. ज्याचा अर्थ आहे - देवा तूच आई आणि बाप आहेस, तूच बंधू आणि मित्र हि तूच, तूच माझे ज्ञान आणि संपत्ती हि तूच, तूच देवा माझ्यासाठी सर्वकाही आहेस.
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा । बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् । करोमि यद्यत्सकलं परस्मै । नारायणयेति समर्पयामि ॥
भागवत पुराणाच्या अकराव्या स्कंदा मध्ये असलेल्या ह्या श्लोकाचा अर्थ - काया (शरीर),वाचा (बोलणे), मन, इंद्रिय आणि बुद्धी तसेच माझ्या प्रकृती आणि स्वभावाने जे काही कर्म करत आहे ते मी नारायणाला समर्पित करत आहे.
अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ।श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्रं भजे - अच्युतकाष्टकम
आदी शंकराचार्य लिखित ह्या अच्युतकाष्टकम चा अर्थ - मी भजतो त्या अच्युताला, केशवाला राम नारायणाला. त्या श्रीधर, माधव आणि गोपिकावल्लभ श्री कृष्णाला. मी भजतो जानकी नायक राम चंद्राला.
शेवट चा मंत्र -
हरे राम हरे राम राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हा सोळा अक्षरी महा मंत्र कालीसंतरण उपनिषद ह्या उपनिषद मधला आहे. कलियुगात नाम संकीर्तन हेच उद्धार करणारे आहे. ह्या शिवाय कलियुगात कोणताही पर्याय नाही हे त्यातून दिसून येते. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार हेच कलियुगातील माणसाने ध्येय ठेवावे, त्यासाठी हे मंत्र म्हटले जातात.