Bhadrapad Sankashti Chaturthi September 2024: गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. काही दिवसांपूर्वी गणरायाची यथोचित सेवा करून बाप्पाला निरोप देण्यात आला. त्यानंतर भाद्रपद महिन्यातील संकष्ट चतुर्थी शनिवार, २१ सप्टेंबर २०२४ रोजी आहे. ही संकष्टी चतुर्थी शनिवारी आली आहे. त्यामुळे गणपती बाप्पासह शनी पूजन करणे शुभ मानले गेले आहे.
संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. मात्र, चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते.
कोणत्या राशींना साडेसाती सुरू?
प्रत्यक्षात साडेसाती येणे ही एक प्रक्रिया आहे. करावे तसे भरावे या उक्तीनुसार शनी आपल्या कर्माचे फळ देत असतो, असे म्हटले जाते. विद्यमान घडीला शनी ग्रह स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत आहे. मकर, कुंभ आणि मीन राशीची साडेसाती सुरू आहे. शनिवारी सकाळी तसेच प्रदोष काळी, तिन्ही सांजेला दिवे लागणीला शनी देवाचे स्मरण, पूजन, उपासना आणि काही उपाय करावेत, असे सांगितले जाते.
- साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते.
- शनीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती, विष्णू, महादेव या देवांची उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते.
- स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. शनिवारी काहीतरी दान करावे.
- शनिवारी शनीदेवाच्या मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावे. तेलाचा दिवा लावावा.
- शनी बीज मंत्राचा जप दररोज करावा. विशेषत: शनिवारी अवश्य करावा.
- शनीची उपासना, शनी स्तोत्राचे २१ वेळा पठण, शनी चालीसा पठण, शनीदर्शन असे उपाय सांगितले जातात.
- हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत.
- ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या शनीधामाची यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे.
- पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.