Sant Balumama Punyatithi: स्वच्छ पांढरे धोतर, पूर्ण हाताचा शर्ट, डोक्याला फेटा, पायात कोल्हापूरी चपला, मेंढ्या राखण्यासाठी हातात काठी, सुमारे पाऊणेसहा फूट उंची, प्रमाणबद्ध बांध्याची शरीरयष्टी, निमगोरा-सावळा वर्ण, रेखीव नासिका, भव्य कपाळ आणि भेदक दृष्टी असे संत बाळूमामा यांचे दर्शन. संत परंपरेतील अलीकडील थोरपुरुष, संतश्रेष्ठ बाळूमामा यांची पुण्यतिथी. यानिमित्ताने बाळूमामा यांच्या चरित्राचा घेतलेला अगदी थोडक्यात आढावा...
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्याच्या चिक्कोडी तालु्क्यातील अक्कोळ गावी ३ ऑक्टोंबर १८९२ रोजी बाळूमामा यांचा जन्म झाला. अत्यंत कष्टमय आणि खडतर जीवनक्रम जगणाऱ्या धनगर समाज घटकात महादेवांनी बाळूमामांच्या रूपात जन्म घेतला, अशी लोकमान्यता आहे. बाळूमामा यांची आई विठ्ठलाची उपासक होती. एकांतात दीर्घकाळ राहणे, बाभळीच्या काट्यावर आरामात विश्रांती घेणे, अव्दैतअवस्थास्वरूपात समाधीत तासन् तास डुंबणे, सांकेतीक भाषेत सूचक बोलणे वैगेरे त्यांचे प्रकार समान्यांना अनाकलनीय होते.
बाळूमामा यांनी लहानपणापासूनच दाखवले चमत्कार
बाळूमामा यांनी लहानपणापासूनच चमत्कार दाखवल्याच्या कथा सांगितल्या जातात. बाळूमामा यांना वळण लागण्यासाठी गावातील चंदूलाल शेटजी जैन यांच्याकडे नोकरीस ठेवले. शेटजींनी दिलेल्या फुटक्या थाळीत जेवत असे आणि जेवून झाले की, थाळी घासून पुसून स्वच्छ करीत असे. एकदा सहजच गोठ्यात गेलेल्या शेठजींच्या म्हाताऱ्या आईला बाळूच्या थाळीतून तेजस्वी प्रकाश परावर्तित होत असल्याचे दिसून आले. कुतुहलाने ती थाळी उचलती झाली तेव्हा थाळीच्या मध्यभागी त्यांना बस्तीचे दर्शन घडले अशी कथा आहे. उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून दोन साधुंना तृप्त केले. त्या साधुंनी बाळूमामांना वाचासिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला. बाळूमामांच्या इच्छेविरूद्ध विवाह केला. दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले. फिरता संसार सुरू झाला. असेच रानात असताना, अरे बाळू, तू गुरू करून घे, अशी आकाशवाणी झाली.
संत बाळूमामा यांची गुरुपरंपरा
बाळूमामांची गुरुपरंपरा श्रीदत्त-श्रीनृसिंहसरस्वती-श्री स्वामी नारायण महाराज-श्री मौनी महाराज (पाटगाव) आणि श्री मुळे महाराज अशी होती. कीर्ती किंवा प्रसिद्धीसाठी बाळूमामा यांना हाव, अपेक्षा नव्हती. भक्तांच्या भल्यासाठी, कल्याण्यासाठी प्रसंगानुसार काही चमत्कार घडवल्याचे सांगितले जाते. पंचमहाभूतावर त्यांची सत्ता होती. संत बाळूमामा कानडी आणि मराठी भाषा उत्तम बोलत. भक्तांशी ते त्यांच्या बोली भाषेत संवाद करत. शिकलेल्या शहरी माणसांशी शहरी भाषेत बोलत. मामांच्या सहवासात असणाऱ्याने किंचीत खोटेपणा किंवा चोरटेपणा केला तरी त्याची भयंकर फजिती होवून त्याला पश्चाताप होत असे. संत बाळूमामांना अधूनमधून कितीतरी चमत्कार करावे लागले. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चमत्कार केल्यावाचून जगात कोणालाही प्रतिष्ठा किंवा महत्व प्राप्त होत नसते. पण बाळूमामानी हे चमत्कार प्रतिष्ठेसाठी किंवा प्रसिद्धीसाठी केलेले नसून प्रसंगवशात केलेले आढळतात. बाळूमामांच्या सानिध्यात माणसे सुधारत यात नवल नाही. मामांच्या सहवासात प्राणी, जनावरे अवगुण टाकून सद्गुणी होतात हे विशेष होय.
अदमापूर बनले दुसरे पंढरपूर
बाळूमामांच्या सहज बोलण्यातून-वागण्यातून अनेक लीला घडत असत. त्यांच्या हातून कळत-नकळत घडलेल्या अनेक चमत्कारांमुळे अनेकांचे जीवन धन्य झाले. जे काही चमत्कार घडत होते, त्याच्या कोणत्याही यशाचे श्रेय संत बाळूमामा यांनी स्वतःकडे घेतले नाही. ‘अखंड नामस्मरण’ आणि ‘रामकृष्णहरी’चा जप हा साधासोपा मूलमंत्र प्रत्येक सश्रद्ध मनामध्ये रुजविणारे संतश्रेष्ठ बाळूमामा ०४ सप्टेंबर १९६६ रोजी श्रावण वद्य चतुर्थीला समाधीस्त झाले. यंदा २०२४ मध्ये २२ आणि २३ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावण वद्य चतुर्थी आहे. समाधीनंतरही बाळूमामा आपल्या भक्तांना अनेक अनुभव देत असल्याच्या कथा प्रसिद्ध आहेत. त्यामुळे भक्तांची गर्दी वाढत आहे. आदमापूर हे दुसरे पंढरपूर झाले आहे. या मंदिरात सदगुरू संत बाळूमामा यांच्या समाधीमंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो. हात-पाय धुतो, प्रशस्त सभामंडपात येतो. पूर्ण आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद अनुभवतो. नकळत हात जोडले जातात, असे म्हटले जाते. या मंदिरात वर्षभरात अनेक उत्सव साजरे केले जातात.