Sant Dnyaneshwar Mauli Jayanti 2024: सापशिडी खेळ हा अत्यंत लोकप्रिय आणि सर्वश्रुत असा खेळ. अबालवृद्ध अगदी सहज खेळू शकतात, असा हा खेळ. या खेळाची निर्मिती संत ज्ञानेश्वर माऊलींनी केलीय, असे सांगितल्यास विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरे आहे, असे सांगितले जाते. डेन्मार्क येथील प्राध्यापक जेकॉब यांच्या संशोधनातून हा ‘मोक्षपट’ उलगडला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या जयंतीनिमित्त याबाबत जाणून घेऊया...
अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार साध्या, सोप्या मराठी भाषेतूनही व्यक्त करता येतात, असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. मराठी भाषेचा अभिमान, भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, वारकरी संप्रदायाचे दैवत, योगी, तत्त्वज्ञ, संतकवी संत ज्ञानेश्वर माऊली. माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।, संत ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख झाला की, या ओळी आठवल्याशिवाय राहत नाहीत. श्रीकृष्ण जन्माष्टमीला संत ज्ञानेश्वर महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा २०२४ मध्ये २६ ऑगस्ट रोजी माऊलींचा जन्मोत्सव साजरा होत आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन व कार्य अगदी अफाट आहे. संत ज्ञानेश्वरांचे विचार, तत्त्वज्ञान जसे कालातीत आहेत, तसे संत ज्ञानेश्वरांनी लावलेला एक शोधही अजरामर आहे. तो म्हणजे मोक्षपट म्हणजेच आधुनिक काळातील आजची सापशिडी, असे म्हटले जाते.
सापशिडीचे जनक संत ज्ञानेश्वर माऊली!
वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणाऱ्या अनेक इतिहास संशोधकांना सापशिडीचे जनक तसेच याचा शोध संत ज्ञानेश्वरांनी लावला असावा, अशी अंदाज होता. ही बाब सिद्ध करणारे थेट पुरावे मिळत नव्हते. सर्वसामान्य जनता यापासून संपूर्णपणे अनभिज्ञच होती. डेन्मार्क जेकॉब यांच्या मदतीने काही वर्षांपूर्वी हे गुपित उलगडले गेले.
...आणि 'मोक्षपट' उलगडा गेला
'इंडियन कल्चरल ट्रेडिशन' या संकल्पने अंतर्गत मध्ययुग काळात भारतात खेळले जाणारे खेळ हा विषय जेकॉब यांनी संशोधनासाठी निवडला. संशोधनादरम्यान त्यांच्या असे लक्षात आले की, तेराव्या शतकातील मराठी संत ज्ञानेश्वरांनी सापशिडीचा शोध लावलेला असू शकतो. अनेक जुने सापशिडी पट त्यांनी मिळवले. पण योग्य संदर्भ मिळत नव्हता. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रातही याबाबत कुठे उल्लेख नव्हता. अनेक प्रयत्नांती संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व संशोधक वा. ल. मंजुळ यांच्याकडे जेकॉब यांनी विचारणा केली. मंजुळ यांनी डेक्कन कॉलेजमध्ये तशा प्रकारचा संदर्भ असल्याचे सांगितले आणि 'मोक्षपट' उलगडा गेला.
ओव्यांद्वारे संदेश अन् मोक्षपटातून जीवनाचे तत्त्वज्ञान
'व्हिज्युअल फॅक्ट फाइंडर- हिस्ट्रि टाइमलाईन' नामक पुस्तकाच्या इ. स. ११९९ ते १२०९ या कालखंडातील जगातील महत्वाच्या घडामोडींविषयी माहिती दिली आहे. 'उल्लेखनीय बाब' या चौकटीत, १३व्या शतकातील भारतीय कवी संत ज्ञानदेव यांनी कवड्या व फाश्याचा उपयोग करून एक खेळ तयार केला. यात खेळाडू शिडीचा उपयोग करून वर चढणार व सापाच्या तोंडी आल्यावर खाली उतरणार. शिडीच्या मदतीने वर चढणे हे चांगले समजले जाई, तर सर्पदंश ही अनिष्ट गोष्ट समजली जात असे. हा खेळ 'सापशिडी' या नावाने अद्यापिही लोकप्रिय आहे, असा उल्लेख सापडतो. जेकॉब यांना डेक्कन कॉलेजमध्ये रा. चिं. ढेरे यांच्या हस्तलिखित संग्रहातून दोन मोक्षपट मिळाले. मोक्षपटाच्या हस्तलिखितावर लिहिलेल्या ओव्यांमध्ये आयुष्य कसे जगावे, कोणती कवडी पडली की, काय करावे याचे मार्गदर्शन अगदी सहजपणे सांगण्यात आले आहे. सापशिडी जरी अधुनिक असली, तरी गर्भितार्थ तोच राहील, यात काही शंका नाही.
कसा खेळला जात असे मोक्षपट?
मोक्षपट हा पहिला सापशिडीपट होता, असे सांगितले जाते. मोक्षपटाचे दोन्ही पट २० बाय २० इंच आकाराचे असून त्यात ५० चौकोनी घरे आहेत. पहिले घर जन्माचे, तर शेवटचे घर मोक्षाचे आहे. माणसाच्या जन्मापासून त्याला मोक्ष मिळेपर्यंतचा प्रवास या पटामधून मांडण्यात आला आहे. 'मोक्षपट' खेळण्यासाठी सापशिडीप्रमाणेच सहा कवड्यांचा वापर करावा लागतो. सहा कवड्या पूर्ण पालथ्या पडल्या तर दान मिळते. सापशिडीच्या खेळाप्रमाणेच यातही साप आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा षडरिपूंची नावे त्यांना देण्यात आली आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रगती करण्यासाठी शिडी आहे, तिला सत्संग, दया, सद्बुद्धी अशी नावे देण्यात आली आहेत. माणसाने आयुष्य कशाप्रकारे जगावे याचे तत्त्वज्ञान या खेळातून सांगण्यात आले आहे.
मूळ संकल्पना भारतीय अन् सापशिडीची आधुनिकता
ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तिनाथ, सोपानदेव, मुक्ताई ही सर्व भावंडे हा खेळ खेळत असत. या खेळाचा प्रसार झाला. इंग्रज भारतात आल्यावर त्यांना हा खेळ प्रचंड आवडला. बुद्धिबळ, ल्युडोप्रमाणे ते हा खेळही इंग्लंडमध्ये घेऊन गेले. व्हिक्टोरियन इंग्लिश प्रमाणे त्यात थोडे बदल ही करण्यात आले आणि त्याचे 'स्नेक अँड लॅडर' असे नव्याने बारसे करण्यात आले. आजच्या काळात आपण त्यांच्या पद्धतीने सापशिडी खेळत असलो तरी, त्याची मूळ संकल्पना भारतीय आहे आणि संत ज्ञानेश्वर माऊली या खेळाचे जनक आहेत, हेही तितकेच खरे आहे, असे सांगितले जाते.