Gajanan Maharaj Punyatithi 2024: भाद्रपद शुद्ध पंचमी शके १८३३ म्हणजेच ०८ सष्टेबर १९१० रोजी श्री गजानन महाराजशेगावी समाधीस्त झाले. विशेष म्हणजे यंदा २०२४ मध्येही ०८ सप्टेंबर रोजी गजानन महाराजांची पुण्यतिथी आहे. माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. गजानन महाराज हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशातील असंख्य तर भक्तगणांचे श्रद्धास्थान आहेत. महाराष्ट्र, देशासह विदेशातही महाराजांचे मठ, मंदिरे असल्याचे सांगितले जाते.
अक्कलकोट स्वामीनी गजानन महाराजांना सांगितले की तू विदर्भात जा आणि शेगाव या गावी प्रकट हो. तिकडच्या लोकांना नामस्मरणाचे महत्त्व पटवून दे. नामस्मरण हे एक चिलखत आहे. नियतीने कितीही वार केले तरी आत कुठेही जखम होत नाही. आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ गजानन महाराजांनी शेगांवमध्ये व्यतीत केला. या काळात त्यांनी लाखो भक्तांचा उद्धार केला, अनेकांना सन्मार्गाला लावले. महाराज हे अद्वैतसिद्धांतवादी होते. महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे सांगितले. गजानन महाराज ब्रह्मज्ञानी, महान योगी, भक्तवत्सल होते. दांभिकतेची त्यांना चीड येत असे. आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते. देहू ,आळंदीनंतर याच पालखीला सर्वाधिक महत्त्व आहे. गजानन महाराजांचे समाधीस्थान असलेले शेगाव संस्थान जगाच्या नकाशावर दिमाखात उभे आहे. सर्व मंदिर व्यवस्थापनांना शिस्त, स्वच्छता आणि उत्तम व्यवस्थापन यासाठी शेगाव संस्थानाने एक आदर्शच घालून दिला आहे.
२१ दुर्वांकुर श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र
शेगांव ग्रामीं वसले गजानन । स्मरणें तयांच्या हरतील विघ्न ।म्हणुनी स्मरा अंतरी सद्गुरुला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१॥
येऊनी तेथे अकस्मात मूर्ति । करी भाविकांच्या मनाचीच पूर्ती ।उच्छिष्ट पात्राप्रती सेवियेला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥२॥
उन्हा तहानेची नसे त्यास खंत । दावियलें सत्य असेचि संत ।पाहूनी त्या चकित बंकटलाल झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥३॥
घेऊनी गेला आपुल्या गृहासी । मनोभावे तो करी पूजनासी ।कृपाप्रसादे बहु लाभ झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥४॥
मरणोन्मुखीं तो असे जानराव । तयांच्या मुळे लाभला त्यास जीव ।पदतीर्थ घेता पूनर्जन्म झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥५॥
पहा शुष्कवापी भरली जलाने । चिलिम पेटविली तये अग्निविणें ।चिंचवणें नाशिले करीं अमृताला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥६॥
ब्रह्म गिरीला असे गर्व मोठा । करि तो प्रचारा अर्थ लावूनि खोटा ।क्षणार्धा त्याचा परिहार केला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥७॥
बागेतली जाती खाण्यास कणसं । धुरामुळे करिती मक्षिका त्यास दंश ।योगबळे काढिलें कंटकाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥८॥
भक्ताप्रती प्रिती असे अपार । धावुनी जाती तया देती धीर ।पुंडलिकाचा ज्वर तो निमाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥९॥
बुडताच नौका नर्मदेच्या जलांत । धावा करिती तुमचाचि भक्त ।स्त्री वेष घेऊनी तिने धीर दिला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१०॥
संसार त्यागियला बायजाने । गजानना सन्निध वाही जिणे ।सदा स्मरे ती गुरुच्या पदाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥११॥
पितांबरा करी भरी उदकांत तुंबा । पाणि नसे भरविण्यास नाल्यास तुंबा ।गुरुकृपेने तो तुंबा बुडाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१२॥
हरितपर्ण फुटले शुष्क आम्रवृक्षा । पितांबराची घेत गुरु परीक्षा ।गुरुकृपा लाभली पितांबराला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१३॥
चिलीम पाजावी म्हणून श्रीसी । इच्छा मनी जाहली भिक्षुकासी ।हेतू तयाचा अंतरी जाणियेला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१४॥
बाळकृष्न घरी त्या बालापुरासी । समर्थरुपे दिले दर्शनासी ।सज्जनगडाहूनी धावुनी आला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१५॥
नैवेद्य पक्वान्न बहु आणियेले । कांदा भाकरीसी तुम्ही प्रिय केले ।कंवरासी पाहुनी आनंद झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१६॥
गाडी तुम्ही थांबविली दयाळा । गार्डप्रति दावियेली हो लिला ।शरणांगती घेऊनी तोही आला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१७॥
जाति धर्म नाही तुम्ही पाळियेला । फकिरा सवे हो तुम्ही जेवियेला ।दावूनी ऐसे जना बोध केला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१८॥
अग्रवालास सांगे म्हणे राममूर्ति । अकोल्यास स्थापुनी करी दिव्यकीर्ती ।सांगता क्षणीं तो पहा मानिएला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१९॥
करंजपुरीचा असे विप्र एक । उदरी तयाच्या असे हो की दु:ख ।दु:खातुनी तो पहा मुक्त झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥२०॥
दुर्वांकुरा वाहुनी एकवीस । नमस्काररुपी श्रीगजाननास ।सख्यादास वाही श्रीगुरुच्या पदाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥२१॥
॥ श्री गजानन, जय गजानन ॥
॥ गण गण गणात बोते॥