पितृ पक्षादरम्यान, लोक पूर्वजांच्या आत्म्यासाठी श्राद्ध, तर्पण, पिंड दान इत्यादी श्राद्धविधी करतात. पण भारतात असेही एक मंदिर आहे, जिथे स्वतःचेच श्राद्ध आपल्या जिवंतपणी घालता येते. ही सुविधा कशासाठी व कुठे आहे आणि त्यामागचे कारण काय ते जाणून घेऊ.
पितृ पक्षाच्या १५ दिवसांत पितरांसाठी श्राद्ध केले जाते. सर्व पितृ अमावस्येला पितृ पक्ष संपतो. या श्राद्धविधीसाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून लोक श्राद्ध आणि पिंडदान करण्यासाठी गया येथे येतात. तीर्थक्षेत्री पिंडदान केल्याने, श्राद्धविधी केल्याने पितरांच्या आत्म्याला सद्गती मिळते श्रद्धा आहे. यावर्षी सर्व पित्री अमावस्या (Sarva pitru Amavasya 2024) २ ऑक्टोबरला आहे. ज्यांना कुणाला पितृपक्षात श्राद्धविधी करता आले नाही त्यांना सर्वपित्री अमावस्येला ते करता येतात. पण गया येथे असेही एक मंदिर आहे, जिथे तुम्हाला स्वतःचेच श्राद्ध जिवंतपणी करता येते. त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊ.
जनार्दन मंदिर, गया
गयामध्ये मृत नातेवाईकांचे श्राद्ध आणि पिंड दानसोबतच जिवंत लोकांचे, तसेच स्वतःचे श्राद्ध आणि पिंड दान देखील केले जाते. गया येथील जनार्दन मंदिराची वेदी ही संपूर्ण जगात एकमेव अशी जागा आहे जिथे आत्मश्राद्ध म्हणजेच स्वतःचे पिंडदान जिवंत असताना केले जाते. गया येथील भस्मकूट पर्वतावर मंगला गौरी देवी मंदिराजवळ जनार्दन मंदिर आहे. असे मानले जाते की येथे भगवान विष्णू स्वतः जनार्दन स्वामींच्या रूपात विसावले होते. त्यामुळे हे देवस्थान अतिशय पावन मानले जाते.
पण जिवंतपणी श्राद्धविधी कशासाठी?
आता प्रश्न असा पडतो की लोक जिवंत असताना पिंडदान करण्याचे कारण काय? ही सुविधा धर्मशास्त्राने अशा लोकांसाठी केली आहे ज्यांना मुले नाहीत किंवा त्यांच्या पिंडदानासाठी त्यांच्या कुटुंबात कोणीही सदस्य नाही. संन्यासी लोक देखील येथे येतात आणि त्यांचे पिंड दान देतात. मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्यांनी सांसारिक जीवन सोडले असल्याने, ते गया येथील जनार्दन मंदिराची वाट धरतात.
मोक्षाचा प्रवास
श्राद्धविधी मोक्षप्राप्तीसाठी केले जातात. आत्म्याचा प्रवास मानवी देहात येऊन संपला तर त्याला मोक्ष मिळतो. पण त्यासाठी मृत्यूपूर्वी त्याच्या आशा अपेक्षा संपायला हव्यात. त्या संपल्या नाही की आत्म्याला नाईलाजाने पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून पुढचा देह धारण करावा लागतो. श्राद्धविधी करताना आत्म्याला शांती मिळून सद्गती मिळावी, हा त्यामागचा हेतू असतो. पितरांच्या नावे नैवेद्य ठेवून त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करू असे म्हटले जाते. त्यानंतर कावळा पिंडाला तथा नैवेद्याला शिवतो अशी श्रद्धा आहे. त्यामुळे जनार्दन मंदिरातील सुविधा त्यांच्यासाठीही म्हणता येईल, ज्यांच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण झाल्या आणि यानंतर आत्मा परमात्म्याशी एकरूप व्हावा हीच अंतिम इच्छा राहते!