आपले आरोग्य आपल्या खाण्याच्या सवयींनवर अवलंबून असते हे आपण जाणतोच, पण त्यापुढे जाऊन ब्रह्म कुमारी शिवानी दीदी सांगतात, 'जसे धन, तसे अन्न, जसे अन्न तसे मन!' आपल्या घरचे अन्न कोणत्या पैशांनी आणलं आहे, यावरही त्या अन्नाची गुणवत्ता ठरते. धन हे नैतिक मार्गाने कमावलेलं असेल तरच त्यातून खरेदी केलेलं अन्न अंगी लागतं. त्याबरोबरच अन्न शिजवून वाढणाऱ्याचे मन शांत नसेल तर ते भाव देखील अन्नात उतरतात अन्यथा अवघ्या तासाभरात ते अन्न खाणाऱ्या व्यक्तीलाही अस्वस्थ वाटू लागतं!
वरकरणी या गोष्टी खोट्या आहेत असे वाटू शकते, मात्र महिनाभर या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले तर आपल्या शरीरावर, मनावर होणारे परिणाम लक्षात येतील. हृदयाचा मार्ग पोटातून जातो असे म्हणतात, ते यासाठीच! अन्न बनवणारी व्यक्ती जेव्हा आस्थेने, प्रेमाने, जिव्हाळ्याने आपल्या कुटुंबाला जेवू घालते तेव्हा मीठ-मसाल्यांबरोबरच अन्नाची रुची वाढते, पौष्टिकता वाढते, साधे अन्न देखील रुचकर लागते. कारण करणाऱ्याचे, वाढणाऱ्याचे आणि जेवणाऱ्याचे मन शांत असते. अलीकडे बाहेर जेवण्याचे प्रमाण वाढले आहे. बाहेरचे लोक कोणत्या मानसिकतेत अन्न तयार करतात याची कल्पनाही नसते. ते अन्न पोटात जाते आणि अनारोग्याचे कारण ठरते! घरात अन्न तयार होत नसल्याने कुटुंबातील एकतेलाही सुरुंग लागत आहे.
म्हणूनच आपले आजी आजोबा, जेवणाआधी मन शांत व्हावे म्हणून हात पाय धुवून जेवायला बसत. जेवण सुरु करण्याआधी श्लोक म्हणत असत. ताटाभोवती सुबक रांगोळी, सुगंधी उदबत्ती लावत असत. हा शाही थाट नसून मन शांत करणारे विधी असत. आता आपण जेवण समोर येताच ओरपायला सुरुवात करतो. त्यामुळे चव घेऊन खाणं, शांतपणे जेवणं आपल्याला माहीतच नाही. जोडीला टीव्ही, मोबाईल नाहीतर फोनवर गप्पा, यामुळे जेवणाचा आस्वादही नीट घेता येत नाही.
अन्न आपल्याला ऊर्जा देते, म्हणून त्याला पूर्णब्रह्म म्हटले आहे. ही सकारात्मक ऊर्जा शरीरात तयार व्हावी म्हणून शांत चित्ताने जेवावे, मन एकाग्र करावे, जेवताना बोलू नये, इतरत्र लक्ष देऊ नये, हे साधे सोपे नियम पाळावेत.
सात्विक अन्न कोणते? मांसाहाराला विरोध का?
शिवानी दीदी सांगतात, 'ज्या प्राण्याचे मांस खाल्ले जाते त्याला अनेक दिवस बांधून ठेवले जाते, त्याला नैसर्गिक मृत्यू न येता बळे बळे मारले जाते. त्यावेळी त्या जीवाचा आक्रोश, तडफड आणि इच्छा, आकांक्षा, वासनांची अपूर्णता त्या देहाला चिकटते आणि ते मांस शिजवून खाणे म्हणजे शरीरात प्रचंड नकारात्मक ऊर्जा भरून घेण्यासारखे आहे. कांदा, लसूण हे सुद्धा कामवासना वाढवणारे आहेत. त्याचे सेवन टाळले की त्यामुळे होणारे लाभ लक्षात येतात. म्हणून सात्विक जेवणात मांसाहार, कांदा, लसूण, मसालेदार जेवण यांचा समावेश नसतो. असे अन्न, जे रुचकर असते आणि पचायलाही त्रास होत नाही त्याला सात्विक आहार म्हटले जाते.