ज्योत्स्ना गाडगीळ
सद्यस्थितीत सभोवताली घडणाऱ्या घटना मन विचलित करणाऱ्या आहेत. अशा वातावरणात मन शांत ठेवायचे असेल, तर समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले `मनाचे श्लोक' यांचे नित्यपठण करायला हवे. मनावर नियंत्रण मिळवले, की देहाला झालेल्या वेदना मनावर विपरित परिणाम घडवू शकत नाहीत. देहाला झालेले कष्ट, हाल, निंदा, वेदना या क्षणिक आहेत. त्या जखमा भरून निघतीलही, परंतु मनाच्या जखमा दीर्घकाळ टिकतात. यासाठीच, मनाला देहापासून अपिप्त ठेवावे, असे समर्थ रामदास स्वामी सुचवतात. देही असोनि विदेही राहणे, ही अवस्था कशी असते, हे श्लोकातून आणि स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगातून जाणून घेऊया.
मना मानसी दु:ख आणू नको रे,मना सर्वथा शोक चिंता नको रे,विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी,विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी।
हेही वाचा : जगातली सर्वात शांत जागा तुम्ही अनुभवली आहे का? - गौर गोपाल दास
परमपूज्य रामकृष्ण परमहंसांशी भेट होण्यापूर्वी स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील घटना...नरेंद्र एका प्रापंचिक चिंतेने हैराण होऊन शोकाकूल अवस्थेमध्ये रस्त्यातून एकटाच फिरत होता. कितीही नाही म्हटले, तरी परमार्थच करायचा हा निश्चय ठाम असताना अजून `सद्गुरु' न मिळाल्याने प्रापंचिक देहबुद्धी दु:ख देतच होती. इतक्यात एक विचित्र दृष्य त्यांच्या नजरेस पडले. वेडसर दिसणारा एक माणूस रस्त्यातून हातवारे करत चालला होता. इतक्यात काही टवाळखोर पोरांनी त्याला दगड मारण्यास सुरुवात केली. मुलांच्या दगड मारण्याने तो विक्षिप्त माणूस आनंदाने अधिकच चेकाळत होता.आता तर अतिमाराने त्याच्या अंगामधून रक्ताच्या धारा सुरू झाल्या. जोराजोराने धावत तो माणूस गावाबाहेर जाऊन एका झाडाखाली बसला. त्याची दयनीय अवस्था नरेंद्रला बघवेना. त्याच्याजवळ जाऊन त्याच्या जखमांवर ममतेने हात फिरवून नरेंद्रने त्याला विचारले. `बाबा, फार लागले का? त्या वात्रट मुलांनी तुम्हाला बराच त्रास दिला. तुमच्या देहाला बऱ्याच जखमा झाल्या आहेत. मी वनस्पतीचा रस काढून लावतो.'
त्यावर खदाखदा हसत तो माणूस म्हणाला, `कोण मुलं? कुठला देह? त्या भगवंताच्या लीलेने मी तर पार मोहून गेलो आहे. आनंदून गेलो आहे. किती सुंदर रीतीने भगवंत माझ्याशी दगडाचा खेळ खेळत होता. खूप मजा आली. हाहाहाहा.;
त्याच्या या वागण्या बोलण्यावरून नरेंद्रच्या लक्षात आले, देहबुद्धीचे भान हरपलेला, विचार विकारांपासून दूर गेलेला, विदेही अवस्थेमध्ये असलेला जीव वेडा नसून ज्ञानी आहे. उन्मनी अवस्थेतील अनुपम सुख भोगीत आहे. विवेकबुद्धीने मुक्त होण्याचे जीवनातील त्याचे ध्येय निश्चित झाले आहे. मनाला शोक, चिंता, दु:ख हे देहबुद्धी प्रबळ असल्याने होते. विवेकाने विदेही अवस्था प्राप्त होते व जीव मुक्त होतो.
आपल्यालाही विदेही अवस्था प्राप्त करण्याचा सराव करायला हवा. तो कसा करायचा? तर त्यावर सोपा उपाय म्हणजे, दिवस चांगले असोत की वाईट, मनाला एकच सूचना द्यायची, 'हे ही दिवस जातील.' मग आपोआप विदेही अवस्थेकडे वाटचाल सुरु होईल.